उस्मानाबाद , देवळाली, धानूरी, हिंगळजवाडी येथे चोरीची घटना 

 

उस्मानाबाद -  मनिष महादेव सोनकवडे, रा. उस्मानाबाद यांच्या लमाण तांडा, जाधववाडी येथील त्यांच्या चुलत्याच्या घरासमोरील पत्रा शेडचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 11 जुलै रोजीच्या रात्री तोडून आतील एक शेळी व दोन बोकड चोरुन नेले. अशा मजकुराच्या मनिष सोनकवडे यांनी दि. 12 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  -  गिरीश चंद्रसेन नाडे, रा. साईगनर, उस्मानाबाद यांच्या घराच्या खिडकीचे गज अज्ञात व्यक्तीने दि. 11- 12 जुलै रोजी दरम्यानच्या रात्री कापून आतील 11 ग्रॅम सुवर्ण दागिने व 3,53,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या गिरीश नाडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिरढोण  - मुकेश सुधाकर जाधव, रा. देवळाली, ता. कळंब यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 11- 12 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून आतील 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. तसेच शेजारील उध्दव तानाजी लोमटे व नारायण भुजंग जाधवर यांच्याही घराचे कुलूप तोडून दोघांचे अनुक्रमे 16,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने व रोख रक्कम सोने- चांदीचे दागिने असे 31,200 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या मुकेश जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  - भारतबाई भैरु घाटे, वय 60 वर्षे, रा. धानुरी, ता. लोहारा या दि. 12 जुलै रोजी आपल्या घरात झोपलेल्या असतांना रात्री 01.00 वा. सु. तीन अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून घाटे यांना चाकूचा धाक दाखवून कपाटातील 8 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व एक भ्रमणध्वनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या भारतबाई घाटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 458, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी -  हिंगळजवाडी येथील ज्ञानेश्वर भोंग, गोविंद कानडे, ज्योतीराम देवकर या तीघांच्या घरांतील अनुक्रमे 2 स्मार्टफोन व 1 टिव्ही संच दि. 12 जुलै रोजी दुपारी 12.15 वा. अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन ज्ञानेश्वर भोंग यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.