उमरगा उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची संख्या वाढवा

आ.सतीश चव्हाण यांची विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना
 

उमरगा- उमरगा येथे असलेले 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय रूग्णांसाठी अपुरे पडत असून सदर उपजिल्हा रूग्णालयाचे 300 खाटांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे अशी आग्रही मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.25) नियम 93 अन्वये विधान परिषदेत केली.

          उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालय हे राज्यसीमे लगत असून याठिकाणी महाराष्ट्र त्याच बरोबर शेजारील कर्नाटक राज्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. परिणामी येथील 100 खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे सदरील उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची सं‘या वाढवून ती 300 करण्यात यावी, तसेच अपुर्‍या मनुष्यबळा अभावी रूग्णालयातील उपलब्ध कर्मचार्‍यांवर रूग्णसेवा देताना अधिकचा भार पडत असणे, याठिकाणी भौतिक सोयीसुविधा मिळणत नसणे, रूग्णालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना राहण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसणे, आहे त्या इमारती मोडकळीस आल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी नियम 93 अन्वये सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सदर उपजिल्हा रूग्णालयाचे 300 खाटाचे श्रेणीवर्धन करून त्यानुसार मनुष्यबळ, औषधी पुरवठा, वैद्यकीय साहित्यासह निवासस्थानाची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी नियम 93 अन्वये केली.

          आ.सतीश चव्हाण यांनी उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयाला आमदार निधीतून रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. त्याचे लोकार्पण 3 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले. यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी सदरील उपजिल्हा रूग्णालयातील अडअडचणी समजून घेतल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी ते शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. त्याच अनुषंगाने आ.सतीश चव्हाण यांनी सदरील प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.