लोहारा शहरासह परिसरात तब्बल सव्वा तास मुसळधार पाऊस  


 फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 
 

लोहारा -  लोहारा शहरासह परिसारात दि.३१ मे रोजी  सव्वातास अखंडित मुसळधार जोरदार पाऊस झाल्याने  शहराजवळील कानेगाव ओढा तुडुंब भरून वाहत होता. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, शहरातील बहुतांश नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसरोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

विजांच्या कडकडाटासह पावने पाचच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस सहा वाजेपर्यंत सतत सुरु होता. ढग पूर्ण अंधारून आले होते. यामुळे सर्व अंधारमय झाले होते. या जोरदार पावसामुळे जवळचे कांहीच दिसत नव्हते. वाहन चालकांना दिवे लावून वाहन चालवावे लागत होते. शहराजवळील कानेगाव ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने कांही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या ओढ्याला पाणी आल्याने शेतकरी अडकून पडली होते. ओढ्याचे पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

 या पावसामुळे शहरातील नाल्या गच्च भरून रस्त्यावरून पाणी वाहत होते. शहरातील कांही नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. लोहारा शहरासह नागराळ, बेंडकाळ, मार्डी, मोघा, खेड, नागूर, माळेगाव, कास्ती बु, कास्ती (खुर्द), लोहारा (खुर्द), भातागळी, वडगाव, आदि, या भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या मुसळधार पावसाचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या पपई, केळी, आडव्या पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कांहीं शेतऱ्यांचे आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.