वाटेफळमध्ये वन्यजीव शिकाऱ्यांची टोळी ग्रामस्थांच्या सतर्कतेने अटकेत
आंबी : वाटेफळ शिवारात चार पुरुष पोत्यांमध्ये माल भरुन संशयास्पदरित्या फिरत असल्याची गोपनीय खबर आंबी पो.ठा. चे सपोनि आशिष खांडेकर यांच्या पथकातील- पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- गायकवाड, सोनटक्के यांना सतर्क ग्रामस्थांकडून मिळाली.
त्या खबरेच्या आधारे पथकाने तात्काळ आज दि. 06 ऑगस्ट रोजी सकाळी 06.30 वा. वाटेफळ शिवारात छापा टाकून रत्नापुर, ता. परंडा येथील उमेश व प्रभास नभीलाल काळे, सुजल गहिनीनाथ काळे यांसह हंगेवाडी, ता. भुम येथील लखन पंच्याहत्तर काळे अशा चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील पोत्यांची झडती घेतली असता पोत्यांत 10 मृत ससे, 1 मृत नर हरीन, 1 मृत पक्षी तसेच शिकार करण्याचे फासे, 2 टॉर्च असे साहित्य आढळले. पथकाने नमूद वन्यजीव व शिकार साहित्य पंचनामा करुन जप्त करुन नमूद जप्त साहित्यासह त्या चौघांना वन परिमंडळ अधिकारी, परंडा यांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी अनाळा येथील वनरक्षक- योगेश रामचंद्र घोडके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम वन परिक्षेत्रीय कार्यालय येथे गु.र.क्र. 1/ 2021 हा वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम- 9 व 39 (3) अंतर्गत नोंदवला असुन पुढील तपास वन परिमंडळ अधिकारी- श्री. चांगदेव विठोबा कारगळ हे करत आहेत.