लोकमतमधील एका फसव्या जाहिरातीमुळे अडीच लाखाची फसवणूक
उस्मानाबाद : लोकमत वृत्तपत्रातील एका फसव्या जाहिरातीमुळे बेंबळी येथील एका व्यक्तीची अडीच लाखाची फसवणूक झाली असून, याप्रकरणी उस्मानाबादेत आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आला आहे.
बंगलोर येथील ग्लोबल फायनान्स या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेची लोकमत वृत्तपत्रातील जाहीरात बघून बेंबळी येथील अनिल वेदपाठक यांनी 2,50,000 ₹ कर्ज प्राप्तीसाठी संस्थेच्या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी समोरील व्यक्तींनी कर्जपुरवठाकामी लागणारे शुल्क वेळोवळी सांगुन वेदपाठक यांना सांगीतलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगीतले.
यावरुन वेदपाठक यांनी संबंधीत बँक खात्यात एकुण 90,698 ₹ रक्कम भरली. त्यानंतर वेदपाठक यांना कर्जही मिळाले नाही व त्या पोटी भरलेली रक्कमही परत मिळाली नाही. अशा मजकुराच्या वेदपाठक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ग्लोबल फायनान्सचे पदाधिकारी- अनुप, अजयकुमार, पुनाजी, प्रवेशकुमार यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशीमध्ये चोरी
वाशी : गणेश महादेव नन्नवरे, रा. रोहीदासनगर, वाशी व गजानन मन्मथ स्वामी, रा. वाशी हे दोघे दि. 12 ऑगस्ट रोजी आपापल्या घरात कुटूंबीयांसह झोपलेले होते. दरम्यान रात्री 01.10 वा. सु. आठ अनोळखी पुरुषांनी त्या दोघांच्या घराचा कडी- कोयंडा उचकटून दोन्ही कुटूंबीयांस चाकु, गज, काठीचा धाक दाखवून नन्वरे यांच्या घरातील 21 ग्रॅम सुवर्ण दागिने व 21,000 ₹ रोख रक्कम आणि स्वामी यांच्या कुटूंबीयांच्या अंगावरील- घरातील 118 ग्रॅम सुवर्ण दागिने, 43,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. या लुटमारी दरम्यान दरोडेखोरांनी गजानन स्वामी यांच्या डोक्यात लोखंडी गज मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या गणेश नन्नवरे व गजानन स्वामी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अनुक्रमे भा.दं.सं. कलम- 395 आणि 395, 397 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.