खबरदार: मोर्चा काढला तर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल... 

उस्मानाबादच्या मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस जारी  
 

उस्मानाबाद - वीज बिल माफ करावे तसेच महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे , या मागणीसाठी मनसेच्या वतीने उद्या २६ नोव्हेंबर ( गुरुवार ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता, तत्पूर्वीच पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून मोर्चा काढला तर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील वीज  ग्राहकांना कोरोना लॉकडाऊन  काळात अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. ही वीज बिले माफ करावीत, तसेच महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे ,  या मागणीसाठी उद्या २६ नोव्हेंबर ( गुरुवार ) रोजी मनसेच्या वतीने लेडीज क्लब ते जिल्हाधिकारी  कार्यालय या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार होता. 

पण तत्पूर्वीच पोलिसांनी मनसे  जिल्हा सचिव दादा कांबळे आणि संघटक अमरराजे  कदम यांना  नोटीस बजावून मोर्चा काढला तर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला आहे. 

सध्या कोरोना विषाणू  प्रादुर्भाव रोखण्यासाठी आदेश निर्गमित केलेले असून, सदरच्या काळात विविध कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच औरंगाबाद पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. 

जनतेची लूट होत असेल तर मनसे पदाधिकारी कधीही गप्प बसणार नाहीत , जनतेच्या हितासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी उद्या प्रचंड मोर्चा काढण्यात येईल  - दादा कांबळे, जिल्हा सचिव, मनसे