उस्मानाबादेत २५ फेब्रुवारी पासून हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांचा उरूस 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक परंपरा शंभर टक्के पाळून साधेपणाने उरूस  साजरा करा - जिल्हाधिकारी
 

उस्मानाबाद  - येथील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी  यांच्या  दर्ग्याचा दरवर्षी मोठया प्रमाणात ऊर्स साजरा करण्यात येतो,पण गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे हा उर्स केवळ धार्मिक कार्यक्रम घेऊन सामाजिक अंतर ठेवून साजरा केला होता. याही वर्षी अद्याप कोरोनाच्या साथीचा प्रार्दुभाव कायम असल्याने हा उर्स धार्मिक परंपरांचे शंभर टक्के पालन करून साजरा करावा.शासनाच्या निर्देशानुसार देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे, कारण जिल्हयात अद्याप कोरोनाच्या साथीचे नियम लागू आहेत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

          येत्या 25 फेब्रुवारी पासून 6 मार्च 2021 पर्यंत शहरात या उरूसाचे आयोजन करण्यात येणार आहेत. या उर्साची 716 वर्षांची परंपरा सुरू आहे. यात दरवर्षी संधल मिरवणूक,कव्वाली, मुशायरा, शबे गजल, महेफिल-ए-समा आणि बाजबयाण आदी कार्यक्रम घेतले जातात.परंतु गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे धार्मिक परंपरागत कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शासन नियमाप्रमाणे सामाजिक अंतर ठेवून घेण्यास परवानगी देण्यात आली होती.याही वर्षी कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. जिल्हयात याबाबतचे  निर्बध कायम आहेत,त्या पार्श्वभूमीवर उर्सच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत उर्स संयोजन सामितीचे सदस्य, वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली,त्यावेळी श्री.दिवेगावकर बोलत होते.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.एन.गपाट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.एस.कानडे, पोलिस अधिकारी सर्वश्री एस.एस.बाबर, आय.एस.सय्यद, सतीश चव्हाण,सु.रा.नुथवंत, जिल्हा वक्फ अधिकारी अहेमद मंजुर खान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शेखर आचार्य, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस.बी. कोडगीरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही सार्वजनिक उत्सवात 150 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास कोरोनाच्या नियमावलीमध्ये मज्जाव केला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व शासकीय नियमांचे पालन करून उर्सचे कार्यक्रम घेण्यात यावेत.धार्मिक परंपरेतील सर्व कार्यक्रम घेण्यास हरकत नाही पण गर्दी होऊन लोकांचे  आरोग्य धोक्यात येणार नाही यांची खबरदारी घेण्याची गरज आहे,असे सांगून वेगवेगळया मिरवणुकीतील गर्दी नियंत्रीत करण्यात यावी.त्यासाठी संयोजकानी पूर्व नियोजन करावे, आणि शासन निर्देशाप्रमाणे ठराविक भाविकांच्या उपस्थितीत मिरवणुकीचे कार्यक्रम पार पाडावेत.दर्ग्यातील धार्मिक विधीसाठीही शासन निर्देशा प्रमाणे भाविक उपस्थित राहतील यांची खबरदारी घ्यावी,असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले की, गर्दीच्या नियंत्रणासाठी 50 तरूण व्हालिटिअर्सची नावे आणि माहिती पोलिसांना देण्यात यावी,पोलिसांनी या तरूणांना पासेस देऊन त्यांची गर्दीच्या नियंत्रणासाठी मदत घ्यावी.नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी दरवर्षी प्रमाणे दर्गा परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, पथदिवे आदी आवश्यक त्या कामांची पूर्तता करावी. ऊर्समध्ये दुकानांना परवानगी नसल्याने त्याबाबत संबंधिताना पूर्व कल्पना द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी उर्स समितीच्या सदस्यांच्या भावना जाणून घेऊन सर्वांचे समाधन होईल,असे मार्गदर्शन यावेळी केले.