उस्मानाबाद : विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटर सील

 


उस्मानाबाद - कोरोना महामारीच्या काळात रुग्णाची लूट करण्याच्या गोरखधंदा उस्मानाबादच्या रामनगर भागात सुरु होता. शहरातील रामनगर भागात  कोरोनाची बेकायदा रॅपिड अँटिजेन टेस्ट करणाऱ्या विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटरवर  महसूल अधिकाऱ्यानी  धाड  टाकून हे सेंटर सील केले तसेच चालकाविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 


 विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटरला कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याची शासन मान्यता नसताना  बोगस किट आणून तो कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट  करीत होता, त्यासाठी रुग्णाकडून किमान दोन  हजार रुपये उकळत होता. ही  माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांच्या  आदेशानुसार उस्मानाबाद तहसीलच्या एका पथकाने या सेंटरमध्ये एक बोगस रुग्ण पाठवून खात्री केली आणि त्यानंतर धाड  टाकून सेंटर सील केले तसेच सेंटरचालक सचिन गायकवाड यास ताब्यात घेऊन, आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, मंडल अधिकारी विकास देशपांडे, तलाठी राऊत तसेच पोलीस कर्मचारी वाघ यांनी ही  कारवाई केली.


उस्मानाबाद शहरातील ‘विद्या विकास डायग्नोस्टीक सेंटर’ या तथाकथीत प्रयोगशाळेवर महसुल विभागाच्या पथकाने काल दि. 30.09.2020 रोजी 15.00 वा. छापा टाकला. कोविड- 19 ॲन्टीजेन चाचणी ही प्रत्येकी 2,000 ₹ दराने पावती न देता करणे, ॲन्टीजेन प्रयोगशाळेस आयसीएमआर संस्थेची मान्यता न घेणे, चाचण्यांचे दर पत्रक न लावणे, प्रयोगशाळेत पॅथॉलॉजीस्ट नसणे. इत्यादी मनाई आदेशांचे उल्लंघन संबंधीत प्रयोगशाळेने केले आहे. यावरुन  उस्मानाबाद सजा तलाठी- मनोजकुमार राऊत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.