उस्मानाबाद शहरात या चार केंद्रावर मिळणार कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

 

उस्मानाबाद  - ४५ वर्षाच्या पुढील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा‌ पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांनाच दि. २९ मे रोजी उस्मानाबाद शहरातील ४ लसीकरण केंद्रावर केवळ कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 

४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस उस्मानाबाद शहरातील २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय, शासकीय  आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रावर ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन किमान २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशांनाच हा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी दोष घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदविलेले ओळख पत्र सोबत घेऊन जावे त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. 

या दिवशी फक्त कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरण करण्यात येणारी उस्मानाबाद शहरातील ४ केंद्रे असून यामध्ये नागरी आरोग्य केंद्र वैराग रोड (फक्त फ्रन्टलाइन वर्कर) (२०० डोस), नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर (२०० डोस), शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय (३०० डोस) व शासकीय जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद (४०० डोस) असे एकूण ११०० डोस देण्यात येणार आहेत. यासाठी ४ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. 

लसींचा पुढील साठा प्राप्त होताच इतर तालुक्यामधून व रुग्णालयांमधून लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. सदरील लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. तर या लसीकरण केंद्रावर केंद्रावर दर्शविल्याप्रमाणे लाभार्थी संख्येएवढे कोव्हॅक्सिन लसींची डोस उपलब्ध असून  प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी लसीकरण केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. 

 या पूर्वी जरी वरीलपैकी लसीकरण केंद्रांमधून कोकण वाटप झालेले असल्यास ते रद्द समजण्यात येऊन दि.२९ मे रोजी नव्याने टोकन वाटप करण्यात येणार आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. त्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.