शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रशांत उर्फ बापू साळुंके यांच्यावर हल्ला 

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल 
 

उस्मानाबाद - शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रशांत उर्फ बापू साळुंके यांच्यावर गुरुवारी सायंकाळी एका गुत्तेदारांने हल्ला केला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. साळुंके यांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 


शहरातील नीरज गॅस एजन्सीसमोर  गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गुत्तेदार सचिन काकडे याने  आपणास बेदम मारहाण केल्याचे साळुंके यांनी सांगितले. 

उस्मानाबाद नगर पालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर साळुंके यांनी दलित वस्ती योजनेत भ्रष्टाचार  केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील त्यांनी दाखल केली होती. 

या याचिकेमुळे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे चिडून गुत्तेदार सचिन काकडे याने हल्ला  केल्याचे साळुंके यांनी सांगितले. काकडे याने दगड आणि ट्यूबलाईट याने बेदम मारहाण केल्याने साळुंके यांच्या डोक्यावर आणि हातापायावर जखमा झाल्या आहेत. 

याप्रकरणी पोलिसांत  अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.