उस्मानाबादमध्ये सलग तीन दिवस शंभूराजे महानाट्य

स्थानिक कलाकारांना मिळणार संधी, निवडीसाठी आज अखेरचा दिवस
 

 उस्मानाबाद -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शंभूराजे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह देशभरात गाजलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या नाटकात दीडशे स्थानिक कलाकारांनाही आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी लाभणार आहे. मंगळवारपासून यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून बुधवार, 10 फेब्रुवारी रोजी कलाकारांना शेवटची संधी असणार आहे. ही निवड शहरातील पोस्ट ऑफिस शेजारी असलेल्या सांस्कृतिक सभागृहात होत आहे.

मागील 31 वर्षांपासून शिवजयंतीचे औचित्य साधून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा इतर कार्यक्रमांबरोबरच प्रा. नितीन बानगुडे-पाटील लिखित आशिया खंडातील सर्वात मोठे नाटक, अशी ख्याती असलेल्या शंभूराजे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

मनातला अंधार चेतवणार्‍या या धगधगत्या कलाकृतीमध्ये स्थानिक कलाकारांना मोठ्या संख्येने काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महानाट्यात दीडशे स्थानिक कलाकारांना रंगमंचावर थेट काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बुधवार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 या वेळेत कलाकारांची निवड केली जाणार आहे. शहरात 22 ते 24 फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. यात आठ ते 13 वर्षेे वयोगटापासून 30 ते 50 वर्षे वयोगटातील कलाकारांना सहभागी होता येणार आहे.

 उस्मानाबाद शहर व ग्रामीण भागातील कलाकारांना भव्यदिव्य रंगमंचावर काम करण्याची सुवर्ण संधी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुले, मुली, तरूण, तरूणी आणि पुरूष तसेच महिला कलाकारांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा. इच्छूक कलाकारांनी अभिजीत देडे, प्रा. मनोज डोलारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी यांनी केले आहे.