उस्मानाबादेत पक्ष्यांसाठी 40 ठिकाणी 'दाणा - पाण्याची' सोय
उस्मानाबाद: जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून वनविभाग आणि पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान आणि जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात 'ओंजळभर पाणी - मुठभर धान्य' या उपक्रमांतर्गत पक्ष्यांसाठी 40 ठिकाणी अन्नधान्याची सोय करण्यात आली.
चालू उन्हाळ्यात वनविभाग आणि पक्षीमित्र यांच्या सहकार्यातून एक हजार ठिकाणी पक्ष्यांसाठी दाणा पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याचीच सुरवात म्हणून आज जिल्हाधिकारी निवासस्थान परिसर आणि धर्मवीर संभाजी महाराज उद्यान परिसर या ठिकाणी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र आणि धान्यासाठी छोटी भांडी लावण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मा.कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वतः सहभाग घेऊन जलपात्र लावली. व पक्षी संवर्धनाच्या दृष्टिने काही सुचना केल्या. त्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दोन्ही पात्रांमध्ये दररोज पाणी आणि धान्य ठेवून पक्षीसंवर्धन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक प्रा.मनोज डोलारे यांनी सांगितले की चिमणी सारख्या पक्षांची सततची घटती संख्या चिंतेचा विषय आहे. पक्षी जीवनावरच कीटकजीवन, वनस्पतीजीवन व परिणामी प्राणीजीवन निगडित असते म्हणूनच पक्षीजीवन ही निसर्ग संतुलनातील सर्वांत महत्त्वाची पायरी मानली जाते. त्यामुळेच या पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे.
तसेच वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके यांनी खास करुन शहरातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले की, या मुक्या जीवांच्या संवर्धनासाठी खोक्यापासून, पाईप, डबे यापासून बनवलेले कृत्रिम घरटे तसेच घरात, गच्चीवर, अंगणात, झाडावर, ऑफिसपाशी, शक्य होईल तेथे कोठेही घोटभर पाण्याची आणि मुठभर धान्याची सोय करा. जेणेकरून या मुक्या जीवांना जगणे सुसह्य होईल आणि त्यांचे संवर्धन होईल.
यावेळी 'ओंजळभर पाणी - मुठभर धान्य' हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके, पक्षी अभ्यासक तथा प्रा.मनोज डोलारे, वनरक्षक शिरीष कुलकर्णी, बालाजी ससाणे, राम माळी, जे.आर.शेख यांनी परिश्रम घेतले.