शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध उस्मानाबादेतील शाळा बंद 

 

उस्मानाबाद  -  राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. ११ डिसेंबर २०२० रोजी शाळांमधील शिपायांची पदे रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये दि. १८ डिसेंबर रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या.  

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करून शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिपाई, सेवक, लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर आदी पदांची अनुकंपासह पद भरती त्वरित करण्यात यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

या निर्णयाचा येथील खासगी शिक्षण संस्थाचालकांनी सर्व शाळा व महाविद्यालये कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदविला.  यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव सतीश निकम,उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समितीचे सचिव दिलीप गणेश, संस्थाचालक संघटनेचे जिल्हा सचिव लहुराज लोमटे, प्रसिद्धी  जिल्हा मुख्याध्यापक संघ तथा विभाग प्रमुख बालाजी तांबे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, आदित्य पाटील, वसंत मडके, ए.एम. काळे, आर.डी सुळ, राजकुमार मेंढेकर, बालाजी जाधव, पांडुरंग लाटे आदी उपस्थित होते.