धाराशिव बस स्थानकाचे प्राथमिक संकल्प चित्र तयार

नागरिकांच्या सूचना घेणार - आ. राणाजगजितसिंह पाटील
 

धाराशिव बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी रुपये १० कोटी निधी मंजूर असून या ठिकाणी बस स्थानक, व्यापारी संकुल व अधिकारी - कर्मचारी निवासस्थाने बांधण्याकरता 'मास्टर प्लॅन' (बहुत आराखडा) तयार करण्याच्या सूचना वास्तुविशारद श्री. ठाकरे यांना देण्यात आल्या आहेत. बसस्थानकाचे प्राथमिक संकल्प चित्र तयार झाले असून आपल्या स्थानिक गौरवशाली इतिहासाचा व वास्तूंचा विचार करत यामध्ये काही बदल सुचविण्यात आले असून नागरिकांनी देखील त्यांच्या सूचना मांडाव्यात असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

महायुती सरकार नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यावर भर देत असून पायाभूत सुविधांच्या विकासावर वेगाने काम करत आहे. बस स्थानकाची तीन हेक्टर जागा असून शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे व्यापारी बाजारपेठेला मोठा वाव असल्यामुळे बस स्थानकाच्या पश्चिम व दक्षिण बाजूला मोठे व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. भविष्यातील आवश्यकतांचा व प्रवाशांच्या सोयी सुविधाचा प्रस्तावीत आराखडयामध्ये समावेश करण्यात आला आहे. वाहनतळ, प्रवासी कक्ष, जेनरिक औषधालय, प्रशस्त उपहारगृह, प्रतिक्षालय चालक - वाहक विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. नवीन बस स्थानकात २२ प्लॅटफॉर्म्स निर्माण करण्यात येणार असून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आगाराचे देखील नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पर्याप्त निधी मंजूर असून गरजेनुसार अधिकचा निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.    बस स्थानकाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी विभागीय नियंत्रक यांच्याकडे जमा कराव्यात, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

विभागीय कार्यशाळेसाठी शहरातील एमआयडीसी लगत २ हेक्टर ३६ आर जागा घेण्यात आली होती. मात्र ही जागा कार्यशाळेसाठी अपुरी पडत असल्याने या ठिकाणी काय करता येईल याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक बांधकाम यांना देण्यात आल्या आहेत.