उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा

 


उस्मानाबाद - अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस  आजन्म कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. 


 उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 88 / 2015 या अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक- श्री. गावडे यांनी करुन आरोपी- शंकर सुर्यभान जाधव, वय 52 वर्षे, विटभट्टी चालक, रा. उस्मानाबाद याच्याविरुध्द् आरोपपत्र सादर केले होते.


या पोक्सो खटला क्र. 15 / 2015 ची सुनावणी उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालय क्र. 1 मा. श्रीमती रेश्मीता राय यांच्या न्यायालयात सुरु होती. यात अभियोग पक्षातर्फे ॲडव्होकेट श्री. एस.एस. सुर्यवंशी यांनी बाजु मांडली. या खटल्याचा निकाल आज दि. 29.09.2020 रोजी जाहीर होउन नमूद आरोपीस मा. न्यायालयाने पोक्सा कायदा कलम- 6 तसेच भा.दं.सं. कलम- 376 (एफ), 506 च्या अपराधाबद्दल दोषी ठरवून आजन्म सश्रम कारावासासह 10,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास वाढीव 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


नेमके काय घडले ? 

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील शंकर सूर्यभान जाधव (५७) आजन्म कारावास  व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पीडित मुलीचे वडील व आई शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शंकर जाधव याने त्यांना स्वतःच्या शेतात मजुरी वर ठेवले होते. तसेच त्यांना वास्तव्यासाठी पत्र्याचे शेडही तयार केले होते. आई, वडील शेतात कामासाठी गेले असता पीडिता एकटीच घरात राहत होती. तेव्हा १० जून २०१५ रोजी दुपारी दोन वाजता जाधव याने शेजारील घरात पिडितेला बोलावले. तिला मोसंबी खायला दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतरही दोन वेळा धमकी देऊन अत्याचार केले. नंतर पीडिता गर्भवती असल्याचे लक्षात आले. 

या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास करून पोलिस निरीक्षक गावडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान पिडीतेने एका मुलास जन्म दिला. न्यायालयाच्या आदेशाने या मुलाला बालकाश्रम ठेवण्यात आले. मुलाचे पितृत्व सिद्ध करण्यासाठी पीडिता, आरोपी व नवजात बालक यांचे डीएनए नमुने न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोन वेळेस पाठवण्यात आले. परंतु, दोन्ही अहवालानुसार आरोपी हा पीडितेचे जन्मलेल्या मुलाचा जन्मदाता पिता आहे, हे सिद्ध होत नव्हते. वास्तविक पाहता या प्रकरणात दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह होते. घटनेमुळे मानसिक धक्क्याने पीडिता न्यायालयात व्यवस्थित साक्षही देऊ शकत नव्हती. 

सुनावणी दरम्यान आरोपी फरार झाला होता. त्यामुळे हा खटला निकाली काढण्यास विलंब झाला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे १३ जणांची साक्ष नाेंदवली. यामध्ये पैरवी कर्मचारी महिला पोलिस नाईक कोठावळे यांनी काम पाहिले. या प्रकरणात पिडितेची आई, आरोपीची नातेवाईक महिला व सोनोग्राफी करणारे डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या प्रकरणात आलेला तोंडी पुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी जाधव याला जन्मठेप व अकरा हजारांची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.