संत गोरोबाकाका समाधी सोहळा रद्द
Apr 1, 2020, 14:28 IST
तेर - संत शिरोमणी गोरोबाकाका यांचा १८ एप्रिलपासून सुरू होणारा वार्षिक समाधी सोहळा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणार नसल्याचे संत गोरोबाकाका व शिव मंंदिर समितीचे प्रशासक पी. बी. भोसले यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायदा लागू झाल्याने सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे गोरोबाकाका मंदिर समितीकडून एप्रिलमध्ये कोणताही सोहळा उत्सव यात्रा कार्यक्रम करण्यात येणार नाहीत. दरवर्षी दशमीदिवशी १८ एप्रिल रोजी या सोहळ्यात सुमारे ७५ च्या आसपास पालख्या, दिंडी, हजारो भाविकासह तेर येथे दाखल होत असतात. एकादशी दिवशी समाधीच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमा होतात.