परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

 

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा देता येणार
उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा होणार




   उस्मानाबाद -  पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेपासून कोणत्याही कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे १४ ऑक्टोबर रोजी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दिली.


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ ऑक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत दररोज दोन सत्रात या परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ३३० केंद्र असून सकाळी ९ ते ३ व दुपारी २ ते ८ अशा या दोन टप्यात परीक्षा होत आहेत. परीक्षेसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न (एकसीक्यु) असून एक तासाची वेळ आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी सुरुवातीला चार तासाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन परीक्षेसाठी दोन्ही सत्रामध्ये प्रत्येकी दोन तासाची वेळ वाढवण्याचा निर्णय  कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी घेतला. 


त्यानुसार पहिले सत्र सकाळी ९ ते ३ व दुपारचे सत्र २ ते ८ या दरम्यान होत आहेत. दरम्यान, पहिल्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी ९ ते १७ ऑक्टोबर या काळात ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. ९ ते १३ ऑक्टोबर या काळातील पेपर  २६, २७ व २८ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 


एकाच दिवशी तिन्ही पेपर अथवा दररोज एक पेपर या प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पेपर देता येतील. तर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पेपर न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी २९, ३० व ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने द्याव्यात, असे विद्यापीठाचे उपरिसर संचालक डॉ. डी के गायकवाड यांनी कळविले आहे.


 उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा होणार


दरम्यान,उस्मानाबाद जिल्ह्यात 14 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांची परीक्षा २४ ऑक्‍टोबर तसेच १ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने 14 ऑक्टोबर रोजी देता न आलेला पेपर द्यावा असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.


ऑनलाइन पेपर दिलेल्यांची संख्या अडीच लाखावर

दरम्यान, कोविडनंतरच्या परिस्थितीमुळे 'फिजीकल डिस्टन्सिंग' ठेऊन ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. दररोज ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या वीस हजार आहे. गेल्या बारा दिवसात अडीच लाख पेपर हे ऑनलाइन पद्धतीने सोडण्यात आले आहेत. सर्व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने विद्यापीठाची परीक्षा सुरळीत पार पडत आहे. आपल्या सर्वांचे हे सामूहिक यश असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.