वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास झाल्यास कठोर कारवाई
Apr 19, 2020, 19:02 IST
उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना (COVID-19) या विषाणूमुळे बाधित झालेल्या तीन रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करुन त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखली उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.तसेच उमरगा तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालये, दवाखाने,प्राथमिक आरोग्य केंद्रे, इन्स्िटट्यूशनल क्वारंन्टाईन इमारती, मजुरांचे निवारागृहे इत्यादी ठिकाणी कोरोना (COVID-19) या आजाराचे संशयित रुग्ण यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार आरोग्य विभागाकडून केले जात आहेत.
कोरोना (COVID-19) विषाणू हा संसर्गजन्य आजार असल्याने त्या आजाराने बाधीत व संशयित रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी,पॅरामेडीकल स्टाफ,परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी हे कोरोना (COVID-19) या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून आपले कर्तव्य व सेवा पार पाडीत असून बाधित व संशयित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करीत आहेत.अशा परिस्थितीत आरोग्य विभागात काम करीत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना समाजातील सर्व घटकांनी मानवतावादी भूमिकेतून पाठिंबा देणे आवश्यक आहे.तसेच आरोग्य विभागात काम करीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समाजातील काही घटकांकडून किंवा व्यक्तीकडून त्रास होऊ नये म्हणून पुरेशी प्रतिबंधात्मक उपाययोजना व कायदेशीर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच कोरोना (COVID-19) या आजाराने बाधित व संशयित रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी,पॅरामेडीकल स्टाफ,परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांना पुरेसे पोलीस संरक्षण देणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दिपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्हयातील कोरोना (COVID-19) या विषाणूजन्य आजाराने बाधित व संशयित रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी,पॅरामेडीकल स्टाफ,परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांना समाजातील घटक किंवा व्यक्तींनी कोरोना (COVID-19) च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या कार्यवाहीमध्ये अडथळा आणला असे समजून त्यांचेवर भारतीय दंड संहिता 1960,फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व प्रचलित कायद्यांतील तरतुदीप्रमाणे आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद यांना आदेशित केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.