उस्मानाबाद : अँटिजेनच्या नावाखाली रुग्णांची लूट
Sep 11, 2020, 19:36 IST
'सह्याद्री' ला जिल्हाधिकऱ्यांनी बजावली नोटीस !
उस्मानाबाद : रुग्णाची सदैव लूट करणाऱ्या डॉ.दिग्गज दापके यांच्या सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. अँटिजेन टेस्टसाठी सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलच्या प्रशासनाकडून दोन हजार रुपये आकारल्याचे समोर आले आहे. या गंभीर बाबीची जिल्हाधिकारी यांना तातडीने दखल घेतली असून हॉस्पिटल प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.चोवीस तासात याचा खुलासा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
नोटीस बजावताना त्यानी शासनाचा निर्णय देखील जोडलेला दिसुन येत आहे. शिवाय ज्या पावतीवरुन हे उघड झाले. ती पावतीदेखील जोडण्यात आली आहे. अँटिजेन टेस्टसाठी शासनाने ६०० रुपये रक्कम स्विकारण्यास सांगण्यात आली, तरी देखील सह्याद्री हॉस्पीटलकडून दोन हजार रुपये शुल्क आकारले जात होते. या प्रकारे जनतेच्या तसेच शासनाच्या पैशाची लूट असल्याची बाब समोर आली आहे. शासनाने मोफत दिलेली ही किट त्यावर हॉस्पीटल प्रशासनाने काही रक्कम घेणे अभिप्रेत असल्याने त्याचा खर्च देखील ठरवुन दिलेला आहे. त्यामध्ये हॉस्पीटलमध्ये टेस्ट करण्यासाठी सहाशे रुपये हा दर निश्चित केलेला असतानाही दोन हजार घेण्याचे धाडस या हॉस्पीटलने केले आहे.
एका पावतीवरुन हा प्रकार उघडकीस आला असला तरी यापुर्वी अशा किती टेस्ट झाल्या. त्याचाही तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या हॉस्पीटलच्या बाबतीत इतर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकाकडुन होऊ लागली आहे. अशा संकटाच्या काळात नागरीकांना आस्थेवाईकपणे दिलासा देण्याची आवश्यकता असतानाही व्यापारी मनोवृत्ती ठेवणे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे बोलले जात आहे. याचाच विचार करुन प्रशासनाने या हॉस्पीटलवर कारवाईचा इशारा दिला असुन आता हे हॉस्पीटल प्रशासन नेमके काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.