कोविड-१९ चा वाढता भयावह प्रादुर्भाव पाहता आठवड्याला बैठक घ्या..!

 
आ.राणाजगजीतसिंह पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी



उस्मानाबाद - जिल्ह्यात कोविड-१९ संसर्ग वेगाने वाढत चालला असून दिवसेंदिवस जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भयावह होत आहे.ग्रामीण भागात देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आपण वारंवार आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे व प्रशासनाला  सूचना करणे गरजेचे आहे.परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी आठवड्याला आढावा बैठक घेण्याची मागणी आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्याकडे केली आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी १७ मार्च रोजी पहिली आढावा  बैठक घेतली होती. त्या बैठकीत आ.पाटील यांनी जिल्ह्यात डॉक्टर्स व आय.सी.यु बेड कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते व त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली होती.मात्र दुर्दैवाने त्याला सहा महिने उलटुन गेले असले तरी  डॉक्टर्सच्या परिस्थितीत कांहीही बदल झालेला नसून आज देखील २५० रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड रुग्णालयात अपेक्षित स्टाफ च्या तुलनेत केवळ ३०% उपलब्ध असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.


जिल्ह्यातील कोविड-१९ ने बाधित रुग्णांची संख्या  पाहता दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. ग्रामीण भागात देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून जिल्ह्यात  बाधितांची संख्या ७८५६ इतकी आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २४०० आहे व २२५ रूग्ण दगावले आहेत. जिल्ह्याचा मृत्यदर ३ % च्या जवळपास आहे.अशा परिस्थितीत अनेक रुग्णालयात ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे. एवढेच नव्हे तर उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातील पी.एम केयर्स फंड (PM Cares Fund )च्या माध्यमातुन उपलब्ध झालेले सर्व व्हेंटीलेटर अद्याप उपयोगात आणले गेले नाहीत यावर आ.पाटील यांनी बोट ठेवत प्रशासनाचा ढिम्म कारभार पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.


जिल्हाभरातुन रुग्ण,त्यांचे नातेवाईक व सामान्य नागरिकांच्या  चाचणी(टेस्टिंग),रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधने (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), विलगिकरण (आयसोलेशन), कोविड केयर सेंटर व रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या बाबी अत्यंत चुकीची असून नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटी त्वरित दूर करणे आवश्यक असल्याचे मत आ.पाटील यांनी व्यक्त केले आहे.


आ.पाटील यांनी आपल्या पत्रात पुणे पॅटर्न चे उदाहरण दिले असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार साहेब दर आठवड्याला लोकप्रतिनिधी व प्रशासना समवेत बैठक घेत आहेत व सदर बैठकीत जे मुद्दे समोर येतात त्यांच्यावर तातडीने उपाययोजना केली जात असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

पालकमंत्री या नात्याने आपण वारंवार आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे व प्रशासनाला  सूचना करणे गरजेचे आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला(१४ ऑगस्ट) येऊन बैठक घेतली तशी आपण मराठवाडा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला(१६ सप्टेंबर) येऊन घेणार असाल मात्र जिल्ह्यातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहता पुण्याच्या धर्तीवर आठवड्याला बैठक घ्या व शक्य होत नसेल तर किमान १५ दिवसाला लोकप्रतिनिधी व प्रशासना समवेत बैठक घ्यावी  व जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी वरील सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता व सुधारणा होण्यासाठी प्रशासनाला कडक सूचना कराव्यात व अंमलबजावणीकडे नजर ठेवावी ही आग्रहाची मागणी आ.पाटील यांनी पालकमंत्री गडाख यांच्याकडे केली आहे.