मृत रुग्णाचे दागिन्यासह मोबाईल, एटीएम काढून घेतले

 
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार 



उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला आहे.  जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवलेल्या रुग्णाचा मोबाईल, एटीएम कार्ड, आधारकार्ड, पैसे काढून घेण्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनाची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे. पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे औदार्यही प्रशासनाने दाखविले नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या प्रति संताप व्यक्त केला जात आहे.


मस्सा खंडेश्‍वरी (ता. कळंब) येथील अंकुश ताटे यांना बीपी आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे मंगळवारी (ता. नऊ) कळंब शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगाही होता. रुग्णालय प्रशासनाने सर्वांचे स्वॅब घेऊन त्या तिघांनाही कळंब येथील आयटीआय येथील केंद्रात दाखल केले. मात्र अंकुश ताटे यांना बीपीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.  त्यांच्यासोबत मुलाला किंवा आईला पाठवावे, अशी विनंती त्या दोघांनी डॉक्टरांकडे केली.मात्र त्यांनी त्यास नकार दिला.

 दरम्यान रात्री अकराच्या सुमारास अंकुश ताटे यांनी मोबाईलवरून पत्नी आणि मुलाशी मोबाईवरून चर्चा केली. ‘मला तिसऱ्या मजल्यावर चालवत नेले आहे. त्यामुळे थोडा आराम करीत आहे. मी सुरक्षित असून, तुम्ही जेवण करा. काळजी करू नका’, असे त्यांनी मुलगा, पत्नीला सांगितले. त्यानंतर बुधवारी (ता. १०) म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता अंकुश यांच्याच फोनवरून एका सिस्टरने फोन करून कळंब कोव्हीड सेंटरला ‘ताटे पेशंट एक्सापयर झाले आहेत’ अशी माहिती दिली.


दरम्यान, अंकुश ताटे यांच्या बॅगमध्ये त्यांचा मोबाईल, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन होते. मात्र दागिन्यासह मोबाईल, एटीएम उर्वरीत सर्वच साहित्य काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईलमध्ये महत्वाची कागदपत्रे असून, संपर्क क्रमांक आहेत. ‘आमचा माणूस गेला आहे. पैशाचे काय, पण मोबाईलमधील महत्वाची कागदपत्रे मिळावीत’ असे नमूद करीत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आमचा मोबाईल मिळवून द्यावा, अशी विनंती अभिषेक ताटे याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी (ता. १६) निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, साहित्य लंपास झालेल्या बॅगमध्ये एका कर्मचाऱ्याचे ग्लोज सापडले आहेत. दरम्यान, मृतासह तिघांचेही अहवाल निगेटीव्ह आले आहे.


रुग्णालयातील कर्मचाऱ्याला याबाबात पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे सांगितले आहे. तसा अर्जही पोलिस ठाण्यात देण्यात येत आहे. लवकरच पोलिस गुन्हा दाखल करून तपास करतील.
आर. व्ही. गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक