पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने उस्मानाबाद पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा पूर्ववत
उस्मानाबाद - नगर परिषदेमार्फत उजनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला पाणी पुरवठा करणार्या योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. गेल्या दहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याची बाब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून साधला. त्यांनंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदयांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना तात्काळ लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
श्री. सिंघल यांनी तातडीने महावितरणच्या लातूर विभागाचे सीईंशी यांना कळवून उस्मानाबाद नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेची वीज जोडण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. लातूरच्या महावितरण कार्यालयामार्फत उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंत्यांना सदर प्रकरणात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंत्यांनी नगर परिषद प्रशासनाला तत्काळ थकबाकी रक्कम भरण्याबाबत सूचना दिल्या. नगर परिषद प्रशासनाने उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीअंतर्गत वीज पुरवठ्याच्या थकबाकीतील 20 लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे करून 14 लाखाचे हमीपत्र दिले असून येत्या 28 तारखेपर्यंत भरणा करण्याबाबत महावितरणला आश्वासित केले आहे. तर सोलापूर जिल्हा हद्दीतील पंपहाऊसच्या थकबाकीची रक्कमही भरण्यात येणार असल्याने शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली होणार आहे.
दरम्यान पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी बारामती येथील महावितरणच्या सीईंशी संपर्क साधून उस्मानाबाद येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिल थकबाकीसंदर्भात सविस्तर माहिती घेतली असता 7.5 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. सदर थकबाकीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल असे पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी महावितरणला आश्वासन दिले. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या प्रयत्नामुळे शहरवासीयांची पाण्याअभावी निर्माण झालेली गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.