पालकमंत्री सावंत धाराशिवमध्ये आले, पण भोसले हायस्कूलकडे फिरकले नाहीत  ....हे आहे खरे कारण...

 

धाराशिव -  पालकमंत्री तानाजी सावंत हे सोमवारी धाराशिव शहरात आले होते, त्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली पण भोसले हायस्कूलच्या कार्यक्रमाकडे शहरात असूनही फिरकले नाहीत.त्यांनी ऐनवेळी पाठ का फिरवली, याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सुधीर पाटील यांनी एकेकाळी तानाजी सावंत यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा जाळला होता, त्याची आठवण एका कार्यकर्त्याने दिल्याने सावंत आल्या पाऊले निघून गेल्याची चर्चा सुरू आहे तर शासकीय जागेत अनधिकृत पुतळा उभा केल्याने सावंत यांनी पाठ फिरवल्याने सांगितले जात आहे.

भोसले हायस्कूल संस्थेला समोरील  मैदान शासनाने क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूलविरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.

त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते.याच शासकीय जागेवर अनधिकृत पुतळा उभा करण्यात आल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमास दांडी मारली तर पालकमंत्री तानाजी सावंत धाराशिवमध्ये असूनही फिरकले नाहीत, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री संजय बनसोडे, प्रवीण दरेकर, आ. सुरेश  धस, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ.सुभाष देशमुख हेही गैरहजर होते.तसेच जे पाहुणे आले तेही पुतळाकडे गेलेच नाहीत.

प्रस्ताविक भाषणात सुधीर पाटील यांनी याबाबत आपली चिडचिड व्यक्त केली.जागेबाबत आ.राणा पाटील यांच्या काही  समर्थकानी तक्रारी केल्या होत्या, विशेष म्हणजे राणा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.