अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी उस्मानाबादेत निधी संकलन सुरु 

श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी संकलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
 

उस्मानाबाद - अयोध्येत जन्मस्थळी प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर बांधण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण देशात निधी संकलन सुरु असून, उस्मानाबाद जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज मोक्षदा एकादशी गीता जयंतीच्या निमित्ताने  पार पडले.  महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते तसेच महंत मावजी नाथ बुवा , महंत वेंकट अरण्यगिरी महाराज , सोमनाथ सुडके महाराज यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. 

उस्मानाबाद शहरात नगरपालिकेसमोरील शॉपिंग सेंटरमध्ये झालेल्या या जनजागरण आणि निधी संकलन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी महंत मावजी नाथ बुवा यांनी प्रभू श्रीरामाच्या राम मंदिराची उभारणी म्हणजे हिंदू तेज , अस्मिता जागी करण्याची संधी असून सर्व हिंदू बांधवांच्या सहभाग यासाठी गरजेचा असल्याचे सांगितलं. निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 सोमनाथ सुडके महाराज यांनी, प्रभू श्रीराम यांनी अवतार घेतला नसता तर मानव जमात दिसली नसती , प्रभू रामचंद्राचे मानवजातीवर उपकार आहेत , समस्त मानव यांनी एकत्र येऊन भव्य मंदिर निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराला आणि साधुसंतांच्या आवाहनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शिवाजी चव्हाण यांनी केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे  दत्तात्रेय चौरे , जिल्हा मंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी तसेच जिल्हा समितीचे सहसचिव विजय वाघमारे तसेच अनेक रामभक्त उपस्थित होते.