शिवसैनिक साळुंके यांच्या प्रयत्नामुळे गालिब नगरमधील अंधार दूर

 

उस्मानाबाद - गालिब नगर भागातील रस्त्यावरील विद्युत खांबावर गेल्या २-३ वर्षापासून ताराच ओढल्या नसल्यामुळे रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना रात्रीच्यावेळी विविध अडचणीचा सामना करावा लागत होता. या भागातील नागरिकांनी याबाबत शिवसेना शहर उपप्रमुख प्रशांत उर्फ बापू साळुंके यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. 

इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन खरोखरच समस्या किती गंभीर आहे ? याची जाणीव करुन देत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत असताना येणाऱ्या तांत्रिक बाबीदेखील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या भागातील तारा दुरुस्तीसह इतर अत्यावश्यक सर्व कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक साळुंके यांचे कौतुक करीत आहेत. 

विशेष म्हणजे साळुंके यांनी कोरोना कालावधीत पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच परिसरात फवारणी, सॅनिटायझर, मास्क व वाफ घेण्याच्या मशीन आदी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले.