कोरोनाचा साईड इफेक्ट ; उस्मानाबादच्या बाजारपेठेत शुकशुकाट
Mar 18, 2020, 09:24 IST
उस्मानाबादकर म्हणताहेत, ‘आजारापेक्षा विलाज भयंकर’ !
उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा संसर्ग होवू नये म्हणून शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, मंदिरे, पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर मंगल कार्यालयात तसेच सार्वजनिक विवाह समारंभ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे याचा थेट परिणाम बाजार पेठेवर झाला आहे.बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असून सोने, कापड, इलेक्ट्रिकल साहित्य खरेदीत ९० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यामुळे ‘आजारापेक्षा विलाज भयंकर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप एकही कोराेना संशयित रुग्ण आढळलेला नसला तरी याची दहशत मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरलेली दिसत आहे.याचाच प्रत्यय मंगळवारी आला. तालुक्यातील समुद्रवाणी गावातील ५५ ते ६० वयोगटाचा व्यक्ती पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे सहज हुरडा आणि डहाळे घेवुन गेला होता, परत गावाकडे आला तर लोकांनी कोरोना संशयित समजून बळजबरीने उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. पुण्याहून माणूस आला की, लोक संशयाने पाहात आहेत, इतकी दहशत कोरोनाची पसरली आहे.
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून रोज एक नवा आदेश निघत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मंगल कार्यालयातील सर्व विवाह समारंभ रद्द करण्यात आले आहेत. विवाह ठरवताना किमान दोन ते तीन महिने अगोदरच तारीख काढली जाते. ३१ मार्चपर्यंत पाच ते सहा तारखा असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शहरासह जिल्ह्यातील सर्वच मंगल कार्यालयातील विवाह समारंभ रद्द करण्यात आले आहेत. कार्यालयाच्या मालकांनी संबंधित वधू किंवा वर पक्षाच्या लोकांना बोलावून त्यांना घेतलेली अनामत रक्कम परत केली आहे. काहींनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतच हातात ठेवण्यात आली. यामुळे संबंधितांना पर्याय नसल्यामुळे विवाह रद्द करावे लागले आहेत, अशी माहिती पुष्पक मंगल कार्यालयाचे संचालक अनिल नाईकवाडी यांनी दिली.
कोरोनाचा परिणाम थेट बाजारपेठेवर दिसून आला. अगोदरच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. त्यात विवाह समारंभही रद्द झाल्यामुळे बाजारावर आणखीन परिणाम जाणवत आहे. कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने - चांदीचे दुकाने, खाद्य पदार्थ आदींची दुकाने ओस पडली आहेत. अशा दुकानांच्या व्यवसायामध्ये सुमारे ८० ते ९० टक्के फटका गेल्या तीन दिवसांमध्ये बसला आहे. ग्राहकांची संख्या इतकी रोडवली आहे की, दररोज ग्राहकांची प्रतिपूर्ती करण्यासाठी धावपळ करणारे दुकानदार दुकानात आराम करताना दिसत आहेत.
शहरातील निंबाळकर गल्ली, नेहरु चौक, मारवाड गल्ली, समतानगर, तुळजाभवानी व्यापारी संकुल आदी गजबजलेल्या ठिकाणी मंगळवारी अगदी नगण्य नागरिक दिसून येत होते. विशेष म्हणजे सायंकाळी व सकाळी पाहणी केली तरी अशीच परिस्थिती दिसून आली. एकूणच शहरासह जिल्ह्यातील विविध भागात आणखी एका मंदीची लाट निर्माण झाली आहे.