आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेऊन ५० दिवस झाले तरी परिस्थिती जैसे थे..!

 
 अंमलबजावणीसाठी कडक सूचना देण्याची आ.राणाजगजीतसिंह पाटील यांची मागणी



उस्मानाबाद - राज्याचे आरोग्य मंत्री राजेश .टोपे यांनी बैठक घेऊन ५० दिवस झाले असून रुग्ण संख्येत १४ पट वाढ झाली आहे. बैठकीत प्रतिनियुक्तीवर फिजिशियन देणे, आरोग्य यंत्रणा रुळावर आणण्यासाठी जेष्ठ अनुभवी अधिकारी देणे, जास्तीत जास्त रुग्णांचे  एच.आर.सी.टी. स्कॅन करणे आदी बाबी तातडीने करण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र अद्याप याची पूर्तता झाली नसून कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वरील सर्व बाबींची अंमलबजावणी होण्यासाठी आपण पुन्हा एकदा उस्मानाबादला येऊन बैठक घ्यावी अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.



उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता दि.१९ जुलै रोजी कोविड-१९ च्या अनुषंगाने बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला होता. त्यावेळी जिल्ह्यात बाधितांची संख्या ४९६ होती, १७० ऍक्टिव्ह रुग्ण होते तर २४ रुग्णांचा मृत्य झाला होता. मात्र आज रोजी जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत भयावह झाली असून  बाधितांची संख्या ७१५९ म्हणजेच आपण आला होता तेंव्हाच्या संख्येच्या जवळपास १४ पटीने वाढली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २४४४ आहे व २१५ रूग्ण दगावले असल्याचे आ.पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.


आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत असलेल्या अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यात सुधारणा करण्यासाठी ना.टोपे यांनी तातडीने चिकित्सक, भुलतज्ञ, आसीयु तज्ञ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीवर नेमणे, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून गतिमान करण्यासाठी एक अनुभवी व कृतीशिल जेष्ठ अधिकारी नियुक्ती करणे, उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात स्कॅन मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर होऊन जास्तीतजास्त रुग्णांचे एच.आर.सी.टी. स्कॅन करणे व आयुष मंत्रालयाने सुचविल्या प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांना अर्सेनिकम अल्बम-३० ही होमीओपॅथीक औषधी तातडीने नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. मात्र बैठक होऊन ५० दिवस झाले तरी अद्याप यातील एकही बाबीची पूर्तता झाली नाही हे दुर्दैवी असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.



५ तज्ञ डॉक्टर्सचे प्रतिनियुक्तीचे आदेश देखील काढले होते. त्यापैकी केवळ एकच ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर रुजू झाले असून उर्वरित तज्ञांनी रुजू होण्यास नकार दिला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्कॅन मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसून आज पर्यंत केवळ ७५ रुग्णांचे एच.आर.सी.टी. स्कॅन करण्यात आले आहेत. तर आपण नियुक्त केलेले अनुभवी व  वरिष्ठ अधिकारी सहायक संचालक डॉ.गोवर्धन गायकवाड यांनी ८-१० दिवस उस्मानाबाद साठी वेळ दिला व त्यांच्या कांही अडचणींमुळे ते पुन्हा उस्मानाबादसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. एवढेच नव्हे तर उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातील पी.एम केयर्स फंड च्या माध्यमातुन उपलब्ध झालेले सर्व व्हेंटीलेटर अद्याप उपयोगात आणले नसल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.


जिल्ह्यातील कोविड-१९ ने बाधित रुग्णांची संख्या  पाहता दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. ग्रामीण भागात देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून अशा परिस्थितीत २५० रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड रुग्णालयात अपेक्षित स्टाफ च्या तुलनेत केवळ ३०% उपलब्ध आहे, तर जिल्ह्यातील अनेक रुग्णालयात रॅपिड अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध नाहीत व ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे. या बाबी अत्यंत चुकीची असून  नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने  आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटी त्वरित दूर करणे आवश्यक असल्याचे मत आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.



आ.पाटील यांनी जिल्हाभरातुन रुग्ण,त्यांचे नातेवाईक व सामान्य नागरिकांच्या  चाचणी(टेस्टिंग),रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधने (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), विलगिकरण (आयसोलेशन), कोविड केयर सेंटर व रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत अनेक तक्रारी आल्या असल्याचे सांगत जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटी,आरोग्य सुविधांची असलेली वानवा लक्षात घेता व  वरील सर्व बाबींची अंमलबजावणी होण्यासाठी ना.राजेश टोपे यांनी  पुन्हा एकदा उस्मानाबादला येऊन बैठक घेणे आवश्यक असल्याचे बाब अधोरेखित होत असल्याने आपण तातडीने उस्मानाबाद येथे येऊन बैठक घ्यावी व वरील सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता व सुधारणा होण्यासाठी कडक सूचना देऊन जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी आ.पाटील यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे केली आहे.