लॉकडाऊन : पूर्वनियोजित विवाह समारंभ  करण्यास परवानगी, पण...

 


उस्मानाबाद जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना (कोविड-19) या विषाणूमुळे पसरत असलेला आजार साथीचा  संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात गतीने पसरत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 रोजी पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भारत सरकार, आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन, आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात लोकांनी येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींने एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व  प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस खालील व्यक्ती, आस्थापना  यांना उद्देशून आदेश काढणे आवश्यक असल्याबाबत खात्री झालेली आहे.

            त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या नगर परिषद, नगर पंचायतीचे कार्यक्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश परिच्छेद क्रमांक 5(१) मधील नमूद सूचनांच्या अधीन राहून दिनांक 4 मे 2020 ते 17 मे 2020 पर्यंत लागू केले आहेत .

            उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील.

             उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहली इत्यादींचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.
               उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत कार्यक्षेत्रात असणारी दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, कलाकेंद्रे, बार व सभागृहे, अंगणवाड्या, शाळा-महाविद्यालये, वस्तीगृहे, आश्रमशाळा, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, व्यायामशाळा, वस्तू संग्रहालय इत्यादी बंद राहतील.

            सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय एकत्र येण्यास मनाई राहील.
              महाराष्ट्र शासनाने जोडपत्र क्रमांक 1 मधील (कोविड-19) चे व्यवस्थापनासंदर्भात सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. हे आदेश खालील बाबतीत लागू होणार नाहीत.

              शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, सर्व प्रकारची वैद्यकीय महाविद्यालये (ॲलोपॅथी,आयुर्वेदिक,होमिओपॅथी) नर्सिंग कॉलेज, बँक, पेट्रोलपंप, रिक्षा थांबे.

            1. पूर्वनियोजित विवाह समारंभ (किमान 50 व्यक्ती पुरता मर्यादित.)
            2. अंत्यविधी (कमाल 20 व्यक्ती पुरता मर्यादित.)
            3. अत्यावश्यक किराणा सामान दूध, दूग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालये जीवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे.
           4. उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनविणे, पार्सल स्वरूपात होम डिलिव्हरी करण्यास परवानगी राहील.
           5. प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनेल इत्यादी) कार्यालय.
          6. घरपोच देणाऱ्या सेवा उदा. ई-कॉमर्स, ॲमेझॉन, फिलपकार्ड, बिग बास्केट इत्यादी सुरु राहील.)
          7. 75 वर्षावरील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. (राष्ट्रीय निर्देशानुसार अत्यावश्यक गरजा व आरोग्यविषयक बाबींच्या पुर्ततेकरिता होणारी हालचाल वगळून)

            वरील ठिकाणे, कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्थापना मालक, चालक, व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वातंत्र्य नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.