उस्मानाबाद : शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू मुंडे यांच्यासह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 

 

उस्मानाबाद - सन २०२० च्या पीक विम्या प्रकरणी  आ. कैलास पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु असताना, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केले होते. याप्रकरणी दहा दिवसानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू मुंडे,  शहर उपप्रमुख प्रशांत साळुंके यांच्यासह सात शिवसैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन वर्षाचा प्रलंबित पीक विमा, नुकसान भरपाई व अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात झालेले नुकसान व त्याची शासनाकडून प्रलंबित असलेली २४८ कोटी ची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी व पूर्ण धाराशिव जिल्ह्यात  शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आ. कैलास पाटील यांनी २४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. शासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याचे लक्षात येताच, शिवसैनिकांनी विविध ठिकाणी तीव्र आंदोलन सुरु केले होते. 

या आंदोलनांचा एक भाग म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू मुंडे, शहर उपप्रमुख प्रशांत साळुंके यांच्यासह काही  शिवसैनिकानी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. हे आंदोलन होऊन दहा दिवस उलटल्यानंतर आनंदनगर पोलिसांनी शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू मुंडे,शहर  उपप्रमुख प्रशांत साळुंके यांच्यासह सात शिवसैनिकावर भादंवि ३५३,१८६,१४३,१४७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

आनंदनगर  पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कागदे यांनी फिर्याद दिली असून, शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला तसेच आपणाशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील केला आहे. 


दरम्यान, एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून दहा दिवसानंतर शिवसैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप  शिवसेनेचे  शहर उपप्रमुख प्रशांत साळुंके यांनी केला आहे.