उस्मानाबादेतील जिजामाता उद्यानाने घेतला मोकळा श्वास 

उद्यानासमोरील २२ अनधिकृत स्टॉल केले जमीनदोस्त
 

उस्मानाबाद  - उस्मानाबादेतील जिजामाता उद्यानाने अखेर मोकळा श्वास  घेतला आहे. उद्यानासमोरील २२ अनधिकृत स्टॉल केले जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तसेच जागेचा वादही लोकप्रतिनिधींनी सामोपचाराने मिटवला आहे.

शहरातील तुळजापूर रस्त्यालगत असलेले जिजामाता उद्यान शहराच्या वैभवात भर टाकणारे होते. परंतु, गेल्या १७ वर्षांपासून उद्यानाची देखभाल व्यवस्थित होऊ शकली नाही. तसेच नवीन सुविधा निर्माण करण्याकडेही दुर्लक्ष झाले होते. यामुळे उद्यानाला उकिरड्याचे स्वरूप आले होते. नंतर तर उद्यानाला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांनी घेरले होते. अनधिकृतरित्या परिसरात स्टॉल उभे करण्यात आले होते.

यामध्ये भाजीपाला विक्रीपासून उघड्यावरील मांस विक्रींचेही स्टॉल होते. यामुळे परिसरात सातत्याने दुर्गंधी असायची. मात्र, आता मंगळवारी व बुधवारी नगरपालिकेने धडक माेहीम राबवून अतिक्रमण हटवले आहे. दोन दिवसात सर्व स्टॉल काढण्यात आले आहेत. सुरुवातीला स्टॉल टाकणाऱ्यांनाच आपणहून अतिक्रमण काढण्याची संधी देण्यात आली होती. काहीनी आपणहून स्टॉल काढले. मात्र, काहींनी काढण्यास नकार दिला. तेव्हा अधिकाऱ्यांनी जेसीबी यंत्राने अतिक्रमण काढले.

तीन उद्यानांसाठी सात कोटी

आमदार कैलास पाटील यांनी पाठपुरावा करून शहरातील तीन उद्यानांच्या विकासासाठी सात कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये जिजामाता उद्यानासाठी तीन कोटी, नगरपालिका शाळा क्रमांक ११ येथील उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी तसेच शाळा क्रमांक १८ च्या विकासासाठी दोन कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. यासंदर्भात ३ नोव्हंेबरलाच शासननिर्णय प्रसृत करण्यात आला आहे.

जागेचाही वाद मिटवला

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदींनी कोकाटे परिवारासोबत असलेला जागेचा वाद सामोपचाराने मिटवण्यात यश मिळवले आहे. यासाठी चार गुंठे जागा पालिका अधिग्रहित करणार असून उर्वरित जागा कोकाटे यांच्याकडे असणार आहे. उद्यानाच्या मुख्य दरवाजापासून रस्त्याच्या कडेने तुळजापूरच्या दिशेने १० गुंठे जागा कोकाटे यांच्याकडे असणार आहे.