विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

 
'डियर तू खूप सुंदर आहेस. तू पहिल्या नजरेत आवडलीस, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद - 'डियर तू खूप सुंदर आहेस. तू पहिल्या नजरेत आवडलीस, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विद्यार्थिनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी विद्यापीठात शिक्षण घेत असून, अभ्यासक्रमांतर्गत तयार करण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट रिपोर्टची माहिती घेण्यासाठी तिने ३ सप्टेंबर रोजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी तिला तोंडावरील मास्क काढण्यास भाग पाडले होते. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पीडितेला मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपवरून 'हाऊ आर यू डिअर स्मिता (नाव बदललेले आहे), 'प्लीज डोन्ट माईंड, बट यू आर सो ब्युटीफूल' असा मेसेज केला. तसेच, तू मला पहिल्याच नजरेत आवडलीस, तुझ्याशी मैत्री करायची आहे. असे अनेक मेसेज केले. हे मेसेज वाईट हेतूने केले असून, पीडित तरुणीने मैत्री करण्यास नकार दिल्यावरही शिंदे यांनी तिला रात्री साडेअकरापर्यंत मॅसेज करून त्रास दिला, असे पीडितेने बेगमपुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून शिंदेविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार करत आहेत.