पवारांसोबत केवळ सदिच्छा भेटच  - देवेंद्र फडणवीस

 

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली. त्याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढू नये. शरद पवार यांच्यावर मध्यल्या काळात शस्त्रक्रिया झाल्या. म्हणून ही केवळ त्यांची सदिच्छा भेट होती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

सोमवारी (ता.३१) दुपारी श्री. फडणवीस यांनी मुंबई येथे श्री. पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ही भेट नेमकी कशासाठी असे म्हणत राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. त्यावर श्री. फडणवीस यांनी ही केवळ सदिच्छा भेटच होती, असे जाहीर केले. 

श्री. फडणवीस हे सोमवारी सायंकाळी जालना दौऱ्यावर आले असता, श्री. पवार यांच्यासोबत आपली काय चर्चा झाली, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले होते. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्यूएस आरक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठीचे आदेश काढले, त्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या समाजाला इतर कुठल्याही प्रवर्गाचे आरक्षण नाही, त्यांना अशा प्रत्येक प्रवर्गाला आरक्षण लागू आहे. त्यामुळे यात नविन काहीही नाही. मराठा समाजाचे एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ऑटोमैटिकली ईडब्यूएस अंतर्गत १० टक्के आरक्षणासाठी ते पात्र आहेत.