मराठवाड्यासह संपूर्ण राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन
 

औरंगाबाद  -   ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार मराठवाड्यासह राज्यातील प्रत्येक समाजाच्या विकासासाठी वचनबद्ध असून पंतप्रधानांनी दिलेल्या या नव्या जबाबदारीतून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविन असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी केले. जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

          यावेळी खा. प्रतापराव पाटील, आ. अतुल सावे, आ. तुषार राठोड, आ. भीमराव केराम, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रवीण घुगे, प्रवक्ते राम कुलकर्णी, महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेंगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

          श्री. कराड म्हणाले की, तळागळातील लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे अशा दुहेरी हेतुने या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. केंद्र सरकारने ओबीसींच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्ती करून आरक्षणासंदर्भात सर्व अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत. देशातील कष्टकरी, शोषित, वंचित व श्रमिक वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाचे सरकार वचनबद्ध असून या समाजाच्या कल्याणासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्याचा फायदा आज खऱ्या लाभार्थ्यांना मिळत असल्याचे ही पाहायला मिळत आहे.

          जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. कराड यांनी परळी, गंगाखेड, लोहा, नांदेड शहर व ग्रामीण भागात अनेकांशी संवाद साधला. या दरम्यान, जीपीएस 95 अंतर्गत पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला. शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत त्यांच्या अडी-अडचणीविषयी चर्चा केली. तसेच बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व व्यवस्थापन प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधला.