मराठवाड्यावर आणखी एक आघात

हिंगोलीचे खा. राजीव सातव यांचे निधन 
 
 ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची शोक संवेदना

हिंगोली - विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर आणखी एक लोकप्रिय नेते  खा. राजीव सातव यांचे पुण्यात निधन झाले. एक तरुण नेतृत्व हरपल्यामुळे मराठवाडा हळहळला आहे. 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले,सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजकन बनली होती. अखेर आज त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली

 राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.

 राजीव सातव यांनी  आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 

 ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची शोक संवेदना

 हिंगोली सारख्या मागास भागातून काँग्रेस पक्षाचा एक युवा कार्यकर्ता म्हणून राजकारणाची सुरूवात करणाऱ्या  काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार राजीव सातव यांनी अवघ्या काही वर्षातच देश पातळीवर आपली वेगळी प्रतिमा तयार केली होती. काँग्रेसचे युवा, अभ्यासू  संघटन कौशल्याने परिपूर्ण असलेले  नेतृत्व अकाली हरपले आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. 

अ. भा. काँग्रेस समितीमध्ये काम करताना राजीव सातव यांच्याशी नेहमीच संवाद होत होता. हसतमुख व विनम्रतेने ते प्रत्येकाशी बोलत होते. आमदार, खासदार व काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये सरचिटणीस, गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून प्रामाणिकपणे काम करणारा एक दूरदृष्टीचा युवा नेता काँग्रेस पक्षाने गमावला आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका बजाविण्याची क्षमता असलेले महाराष्ट्रातील हे नेतृत्व काळाने आमच्यातून हिरावून नेले आहे. 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांचा विश्वास संपादन करून या विश्वासाला कामाच्या पूर्ततेची जोड देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच २०१७ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा गुजरातसारख्या राज्यात संघटन उभारून काँग्रेसचे पुनरागमन करण्याचे काम त्यांनी करून दाखविले .

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या या यशात राजीव सातव यांच्या संघटन कौशल्याचा सिंहाचा वाटा होता.काँग्रेस पक्षाप्रती समर्पित ह्या नेत्याने स्वत:च्या हितापेक्षा पक्षहित अधिक मानले. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते,यात राजीव सातव यांचा समावेश होता. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी २०१९ मध्ये निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाप्रती असलेली ही निष्ठा त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. काँग्रेस पक्षाने एक उमदे व उज्वल भविष्य असणारा नेता गमावला आहे.  खासदार राजीव सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अतीव दु:ख झाले असून मी नि:शब्द झालो आहे, असे डॉ. नितीन राऊत यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

खा. राजीव सातव यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

खा. सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते. 

खा. राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.