भाजपचे काही लोक गांजा मारूनच काम करताहेत - शिवसेना 

पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे - भाजप 
 
शिवसेना - भाजपमध्ये कलगीतुरा रंगला 

मुंबई -'महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचे पीक जास्त निर्माण झाले आहे आणि काही लोक गांजा मारूनच काम करताहेत असे दिसतेय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची नाकाx टेस्ट केली पाहिजे. एनसीबीने अशा बेताल बोलणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे. हे लोक काय मारतात? त्यांना ते कोण पुरवते? हे समजणे गरजेचे आहे.' अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सैरभैर झालेल्या भाजप नेत्यांचा आज समाचार घेतला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपसह विरोधी पक्षाला चांगलेच झोंबले आहे. भाजपचे नेते अक्षरशः सैरभैर झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीबद्दल ते उलटसुलट विधाने करू लागले आहेत. संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशा भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत हे सिल्वासामध्ये आहेत. दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता.

'दादरा नगर हवेली आणि सिल्वासामधील प्रशासन ज्या दहशतीच्या मार्गाने चालवले जात आहे त्याचा उल्लेख मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वीच केला होता. दादरा नगर हवेली हा पेंद्रशासित प्रदेश असल्याने तेथील प्रशासक आयएएस अधिकारी असतो. परंतु भाजपने इथे सत्ता आल्यानंतर गुजरातमध्ये निवडणूक हरलेल्या प्रफुल्ल खेडापटेल या राजकीय माणसाची सोय तिथे लावली. आयएएस अधिकाऱ्याच्या जागेवर अन्य व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमणे हे घटनाबाह्य आहे.' असे संजय राऊत या मुलाखतीत म्हणाले.

शिवसेनेच्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं  आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे की, पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे. विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडते म्हणून मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची जुनी खोड आहे. ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची  भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे.

अभिमान आहे  बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन सर्वसामन्य शिवसैनिकांना मोठं केलं. आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं सांगत त्याला पर्यावरण मंत्री बनवतात. बरं मुख्यमंत्रिपदाला घेण्याला भाजपाचा आक्षेप नाही. पण विश्वासघातकी मार्गानं ज्यांना लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांनाच सोबत घेऊन पदं मिळवणं याला मर्दानगी म्हणतात का ? असा सवालही केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. 

आ. नितेश राणे यांनीही शिवसेनेच्या या टीकेला जोरदार टोला मारला आहे. मालकाचा घरीच "गांजाचा बादशाह" असल्या मुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते..गांज्यावर इतके प्रेम बर नाही, असे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे.