महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे 12 रोजी राज्यभर निदर्शने

 



मुंबई  - महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या  वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत , अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली.


 भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. 


पाटील म्हणाले की, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले.  शेतकरी आणि कामगार हिताचे कायदे मंजूर केल्याबद्दल , रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीचे स्वप्न साकार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत त्याच बरोबर  मराठा आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर कृषी व कामगार कायद्यांमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती शेतकरी आणि कामगार वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 


राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील , तरूणींवरील , बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भाजपातर्फे निदर्शने करण्यात येतील. मुंबईत शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चैत्यभूमीपर्यंत लॉँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली.