राज्यात लॉकडाऊन वाढणार ... राजेश टोपे यांनी दिले संकेत ...

 


मुंबई -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेला लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल रोजी समाप्त होणार, असे भ्रमात कुणीही राहू नये. राज्यातील लॉकडाऊन पुढे आणखी काही दिवस राहू शकतो. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसे संकेत दिले आहेत.


राज्यात कोरोना बाधित  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजमितीस देशभरात ३ हजार रुग्ण तर राज्यात 484  रुग्ण आढळले आहेत.१९ जणांचा मृत्यू झाला आहे.  अनेक ठिकाणी चाचणी रिपोर्ट पॉजिटीव्ह येत आहेत. त्यामुळे राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.


“१५ एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे,” असं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहे.


“देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सर्वाजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठी काम आहे. त्यामुळे लॉकडाउन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असं माझं वैयक्तीक मत आहे”, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स डॉट कॉम’ने दिलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करताना लॉकडाउनचे निर्बंध टप्पाटप्प्यामध्ये काढण्यासंदर्भातील संकेत दिले. लॉकडाउन काढून घेण्यासंदर्भातील नियोजन राज्य सरकारने करावे आणि त्यासंदर्भात काही सल्ले अथवा सूचना असल्यास त्या केंद्र सरकारला कळवाव्यात असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. मात्र लॉकडाउनचे सर्व निर्बंध एकदम उठवल्यास मागील अनेक आठवड्यांपासून करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांचा आणि आतापर्यंत केलेल्या कामाला फारसा अर्थ राहणार नाही असं राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्याचं मत आहे.


मुंबईमध्ये करोनाचा फैलाव होण्याचा धोका असला तरी उपाययोजनांच्या बाबतीत राज्य सरकारने कोणतीही कसर सोडली नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. “आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी जागोजागी काम करत आहेत. २९२ टीम सध्या मुंबईमध्ये काम करत आहे. करोनाचे संक्षयित रुग्णांना ओळखण्यासाठी मुंबईमध्ये ८०० जण काम करत आहेत. दिल्लीमध्ये मागील महिन्यात निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमातील व्यक्तींना संसर्ग झाल्याने राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. मात्र आम्ही यावर नक्कीच नियंत्रण मिळवू,” अशा शब्दांमध्ये टोपे यांनी मुंबईतील परिस्थितीचं वर्णन केलं.