केंद्र सरकारने दिलेले धान्य का देत नाही, ते सांगा : केशव उपाध्ये

 


मुंबई  - संकटकाळी भाजपाने राजकारण न करण्याचा उपदेश सचिन सावंत यांनी देण्याचे काहीच कारण नाही. या काळात आम्हाला राजकारण तर दूर टीका सुद्धा करायची नाही, हे आम्ही वारंवार सांगत आहोत आणि म्हणूनच प्रत्येक बाब ही विनंतीच्या स्वरूपात कळवित आहोत. यात मूळ मुद्दा केंद्र सरकार तीन महिन्यांचे धान्य उपलब्ध करून देत असून सुद्धा ते देण्यास आपले सरकार का तयार नाही, याचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे, असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.


केंद्र सरकारने 3 महिन्यांचे संपूर्ण धान्य कुठल्याही योजनेच्या व्यतिरिक्त संपूर्णपणे मोफत आणि एकत्रितपणे देण्याचा आदेश स्पष्टपणे दिलेला असताना आणि त्यातील 90 टक्के धान्य हे महाराष्ट्रात आलेले असताना केंद्र सरकारमधील मंत्री तसे स्पष्टपणे सांगत असतील, तर ते देत का नाही, याचे उत्तर देणे सोडून फडणवीसांना स्वत:चे नाव लाभार्थ्यांच्या यादीत घालायचे आहे का, केंद्रीय मंत्र्यांच्या संवादाला उंदराची मांजराला साक्ष अशी भाषा वापरण्याची काँग्रेस प्रवक्त्यांना लाज वाटली पाहिजे, असे आम्ही म्हणणार नाही, कारण, ती त्यांची संस्कृती आहे. केंद्राच्या आदेशाची प्रत देऊन सुद्धा तोही आदेश खोटा ठरविण्याचा प्रयत्न ते करताहेत, हे तर फारच हास्यास्पद आहे. सचिन सावंत यांचे पदाअभावी आणि त्यांना पक्षात कुणी मोजत नसल्याने मानसिक संतुलन ढासळले, हे आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितले आहे. आज त्यापेक्षा अधिक काही पुन्हा सांगण्याची गरज नाही, असेही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.