कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये ?

 


लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्याच्या वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं.यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला धारेवर धरलं.

त्यांनी ट्वीट केलं आहे की, "महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळेश्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे घडलं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरणं देणं गरजेचं आहे."

शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय पत्र मिळणं अशक्य : किरीट सोमय्या

शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे. शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याचं जगजाहीर आहे, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.

स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात

वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल 

मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन सातारा जिल्हा प्रवेश बंदीचा आदेशाचा भंग करून मुंबईतून महाबळेश्वर येथे आलेल्या उद्योगपती व त्याच्या कुटुंबियांसह तेवीस जणांवर सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाई केली आहे.

 वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल केला. कपिल वाधवान, अरुणा वाधवान, वनिता वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, शत्रुघ्न घाग, मनोज यादव, मनोज शुक्ला, अशोक वाफेलकर, दिवाण सिंग, अमोल मंडळी, लोहित फर्नाडिस, जसप्रीत सिंग, जस्टिन दिमीलो, इंद्रकांत चौधरी, एलिजाबेथ आयपिलाई, रमेश शर्मा, प्रदीप कांबळे, तारका सरकार यांच्यासह लहान मुलांचा सहभाग असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतरांच्या जीविताला धोका होऊ शकतो. असे असतानाही हयगय व घातकीपणाची कृती करून ते महाबळेश्वरमध्ये आले. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे भा. द. वि. कलम १८८, २६९, २७०, ३४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर 
लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.