अनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी ५६९ तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण

 


मुंबई - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहिलेल्या तरुणांना राज्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.


या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेशिवाय थेट प्रवेश दिला जाणार आहे. आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर थेट नोकरी मिळणार आहे. यासाठी कंपनीच्या मृत कर्मचाऱ्यांच्या अथवा कायमस्वरुपी विकलांग झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ५६९ अर्हताविरहित अवलंबितांना सन २०२०-२१ मध्ये तारतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण एक वर्ष कालावधीचे असेल. विद्युत परिमंडळाच्या परिसराजवळील जेथे शक्य आहे अशा २७ आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येकी २१ प्रवेश क्षमतेप्रमाणे या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. अभ्यासक्रमासाठीचे सर्व विद्यार्थ्याचे शुल्क विद्युत वितरण कंपनीमार्फत देण्यात येणार आहे असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.


अनुकंपा नोकरीसाठी पात्र असलेल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाअभावी नोकरी गमवावी लागू नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. घरातील कमावत्या व्यक्तीचा आधार गमवावा लागलेल्या या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.