धाराशिवमध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा महिलांसाठी मोफत शो !

महिला, युवतींची तुफान गर्दी; प्रचंड प्रतिसादात चित्रपटाचे स्वागत
 

धाराशिव - देशभरात वादळी चर्चा होत असलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा शहरातील श्री टॉकीजमध्ये मोफत शो रविवारी (दि.7) आयोजित करण्यात आला. दुपारी 12 ते 3 आणि 3 ते 6 अशा दोन्ही वेळच्या शोला महिला व युवतींची तुफान गर्दी झाली होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत देशभरातील राजकीय नेत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिलांनी मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पहावयास मिळाले.

देशात 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे कथानक हिंदू, ख्रिश्चन धर्मातील महिला व युवतींचे धर्मांतरण करुन त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या सत्य घटनेवर आधारित असल्याचा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे. त्यावरुन राजकीय क्षेत्रात दररोज दावे-प्रतिदावे केले जात असल्याने चित्रपट मात्र तुफान गर्दी खेचत आहे.  तर काही ठिकाणी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे रविवारी धाराशिव येथील रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी या चित्रपटाच्या दोन शोचे मोफत आयोजन श्री टॉकीजमध्ये केले होते. दोन्ही शोज्ना महिला व युवतींची तुफान गर्दी पहावयास मिळाली. चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिला व युवतींनी चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन प्रत्येक महिला व मुलीने हा चित्रपट पहायला हवा असे मत व्यक्त केले.

मोफत शो आयोजनासाठी रामराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन मुंडे, राहुल काकडे, विश्वजीत शिंदे, नितेश यादव, दिपक कोकाटे, विवेक निंबाळकर, ओंकार घेवारे, शशिकांत लोकरे, आकाश राठोड, सागर देशमुख, सुमित बागल, कुणाल वाघमारे, परेश कदम, ओम लक्षे, तेजस देवकते, रोहन सुरवसे, शंभु निंबाळकर, विजय ईटकर, आनंद वरपे, आकाश वरूडकर, प्रसाद शेरकर, प्रविण लोंढे या तरुणांनी पुढाकार घेतला.

महिला भगिनींबाबत दुर्घटना घडू नये - शेंडगे

देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या घटना घडत आहेत. त्याची जाणीव महिला भगिनींना होऊन यापुढील काळात अशा घटना घडू नयेत. त्यांच्यामध्ये जाणीवजागृती व्हावी या हेतूने आम्ही धाराशिव येथे महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दोन शो आयोजित केले. त्याला महिला, युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे रामराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह शेंडगे यांनी सांगितले.