योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करणार  :  सावंत

•   भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
 

धाराशिव  -   जिल्ह्यातील विविध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील कृषी, आरोग्य,सिंचन क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून देतांना विविध योजना,प्रकल्प,उपक्रम व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.

                 आज भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाहोरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना ते बोलत होते.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुवासाहेब जाधव,सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे,उपजिल्हाधिकारी संतोष भोर, राजकुमार माने व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

                    पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की,17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे.हे वर्ष मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी विविध हुतात्मा स्मारक बांधकाम,सुशोभिकरण व स्मृतीस्तंभ बांधकाम करण्यासाठी मंजूर केला आहे.आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे." शासन आपल्या दारी "  उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना नागरीकांपर्यत शासन घेवून जात आहे.नागरीकांना सन्मानपूर्वक योजनांचा लाभ मिळत आहे.असे त्यांनी सांगितले.

                      महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या व शहराच्या विकासाचा आराखडा 1100 कोटींचा करण्यात येत असल्याचे सांगून प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, या विकास आराखड्याने तुळजापूर शहराचा चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत जिल्ह्यातील नगर परिषदांना 585 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे या मोहिमेला जिल्हा प्रशासनाने अत्यंत कुशलतेने हाताळून 80 टक्के शेतरस्ते अतिक्रमणमुक्त केले आहे.उर्वरित प्रलंबित प्रकरणेही लवकर पूर्ण होतील.असे ते म्हणाले.

                    गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधीत शेतकऱ्यांना 137 कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करुन दिल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले, तो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील 287 गावाची निवड केली आहे.सन 2023-24 मध्ये 5 हजार 35 शेतकऱ्यांना 17 कोटी 66 लाख रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये 5 लाख 19 हजार 662 शेतकऱ्यांना 352 कोटी 77 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात आली.या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पिक विमा योजना सुरु केली आहे.शेतकऱ्यांना प्रति अर्ज 1 रुपया भरून योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे.जिल्ह्यातील  7 लाख 57 हजार 557 शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून या योजनेत सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले.

               जिल्ह्यात रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी 6 हजार शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली असल्याचे सांगून ते म्हणाले,

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत 44 हजार  शेतकऱ्यांना 128 कोटी 83 लाख रक्कमेचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील कळंब आणि मुरूम या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीत ई-नाम योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑनलाईन नेटवर्कमध्ये झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास वाढीव भाव मिळण्यास मदत होणार आहे.

 स्व.बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजनेतून भूम तालुक्यातील देवंग्रा येथे विश्वरुपा नदीचे खोलीकरण केल्याने ती तुडुंब भरून वाहत आहे.अशाच प्रकारची जलक्रांती जिल्हयात आणून जिल्हा सुजलाम व सुफलाम करून लवकरच उजनी धरणातून सीना-कोळेगाव येथे जून 2024 पर्यंत पाणीही येणार असल्याचे डॉ.सावंत म्हणाले.

<a href=https://youtube.com/embed/rg3ZxKxSLTc?autoplay=1&mute=1><img src=https://img.youtube.com/vi/rg3ZxKxSLTc/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640">

           “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेचा लाभ शहरी भागातील गोरगरीब,मजूर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मिळत असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले,आजपासून मोफत उपचारांची अंमलबजावणी सुरू होत आहे.रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे निःशुल्क सर्व तपासण्या व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे.आता नवीन जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयांना देखील मंजुरी देण्यात  आली आहे.या जिल्हा रुग्णालयासाठी जमीन संपादित करून त्या जागेवर नवीन जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तसेच पदनिर्मितीबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल.परंडा येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय तसेच 50 खाटांवरुन 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी देण्यात आली आहे.भूम येथील 30 खाटांवरुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील पाथ्रुड,ईट आणि माणकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासही शासनाकडून मान्यता मिळाली आहे. सास्तूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या 30 खाटाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली आहे.अनाळा येथे ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी देण्यात आली आहे.गेल्या वर्षभरात जिल्हयात वेगवेगळ्या आरोग्य मोहिमा राबविण्यात आल्या.महिलाच्या आरोग्यासाठी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अंतर्गत 83 हजारपेक्षा जास्त मातांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

               जिल्हा परिषदेअंतर्गत 622 ग्रामपंचायतीमधील दहन व दफन भूमीसाठी जागा उपलब्ध नसणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत सूचित केल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले,यासाठी जागा खरेदी व आवश्यक जन सुविधा योजनेतंर्गत  शेड व रस्ते  यासाठी लागणार 31 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. थेट खरेदी आणि जन सुविधा योजनेतंर्गत सर्व पायाभुत सुविधायुक्त दहन व दफन भूमी उपलब्ध करून देण्यामध्ये आपला जिल्हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे.याबद्दल पालकमंत्री डॉ.सावंत यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

                 यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक,पत्रकार बांधव, नागरिक व विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हणमंत पडवळ यांनी केले.