उस्मानाबाद कडकडीत बंद 

कृषी कायद्याविरुद्ध सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले 
 

उस्मानाबाद - केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर दोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आखिल भारतीय संघर्ष समितीने आज पुकारलेल्या भारत बंदला उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. या बंदमध्ये भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्ते उतरल्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 


 केंद्र सरकारने कोणालाही विचारात न घेता जे तीन कृषी कायदे लागू केले आहेत. त्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. दूध, भाजीपाला व मेडिकल आदी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे. रिक्षा , खासगी वाहतूक बंद आहेत. शाळा - महाविद्यालय बंद आहेत. 

बंदच्या दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, शेकाप आदी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन शिवाजी चौकात निदर्शने केली. केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचे मत राष्टवादी काँग्रेसचे नेते जीवनराव गोरे, डॉ. प्रताप पाटील, शेकापचे धनंजय पाटील आदींनी व्यक्त केले.