उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस , चार गुन्हे दाखल

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या दोन योजनेमध्ये नऊ कोटी ५१ लाख ७२ हजार रुपये शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी  4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेल्या चौकशीत असे आढळले की, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या 2 योजनांमधील 4 कंत्राटात साहित्य पुर्तता केली असे भासवून बनावट डिलीव्हरी चलनांद्वारे एकुण 9,51,72,100/-रुपये रक्कम मंजुर करुन अधिकारी व ठेकेदारांनी अपहार केला आहे. त्या व्यक्ती- संस्थांविरुध्द प्रथम खबर नोंदवण्यासाठी नायब तहसीलदार  संतोष सुरेश पाटील यांना  जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे.



 अशा मजकुराच्या श्री. संतोष पाटील, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी  आज दि. 27.06.2020 रोजी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन खालील प्रमाणे 4 गुन्हे     1) तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी- श्री. अभय देविदास मस्के 2) मनोज औदुंबर मोरे, रा. उस्मानाबाद 3) ‘आध्या एन्टरप्रायझेस’ चे मालक- राजेंद्र गायकवाड, रा. समर्थनगर, उस्मानाबाद 4) ‘एटूझेड एन्टरप्रायझेस’ चे अज्ञात मालक 5) ‘ए.वन एन्टरप्रायझेस’ बालेवाडी, पुणे चे अज्ञात मालक 6) ‘इ झोन एन्टरप्रायझेस’ चे मालक-फहीम जलील शेख, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद या सर्वांविरुध्द भा.दं.सं. कलम- 420, 409, 467, 468, 471, 34 अन्वये नोंदवण्यात आले आहेत. या चारही गुन्ह्यांचा तपास श्री. मोतीचंद राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजना अंतर्गत सन- 2018-19 करीता जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत लोहारा, उमरगा, कळंब या 3 नगरपालीका क्षेत्रात खुली व्यायाम शाळा उभारनीचे 2,48,69,100/-रुपये चे कंत्राट जी.ई.एम. पोर्टलद्वारे प्रताप राजेंद्र गायकवाड, रा. समर्थनगर, उस्मानाबाद यांच्या ‘आध्या एन्टरप्रायझेस’ ला देण्यात आले होते. ‘आध्या एन्टरप्रायझेस’ चे मालक- राजेंद्र गायकवाड यांनी नमुद व्यायाम शाळा साहित्य न पुरवीता छायांकीत प्रत (फोटो कॉपी) असलेले व नगरपरीषद प्रशासन विभाग या कार्यालयाचा शिक्का नसलेले बनावट डिलीव्हरी चलन सादर केले. तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी अभय देविदास मस्के यांनी कंत्राटात नमुद साहित्य प्रत्यक्षात मिळाले नसतांनाही चलनाच्या सत्यतेची खात्री न करता कंत्राटदाराशी संगणमत करुन संपुर्ण रक्कम मंजुर करुन ठेकेदारास अदा करुन शासकीय पैशांचा अपहार केला.

या  शासकीय अपहार प्रकरणी भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्ताकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. या अपहार प्रकरणात अनेक बडे अधिकारी अडकले असताना केवळ एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अजून तरी अनेक बडे मासे बाहेर आहेत.