मेडिकल कॉलेज : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला उस्मानाबादच्या शिवसेना खासदार आणि आमदारांचा विरोध 

अट रद्द न झाल्यास उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव रेंगाळणार 
 

उस्मानाबाद -  उस्मानाबादला नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आज मुंबईच्या  वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक  बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि  कळंब- उस्मानाबादचे आ.कैलास घाडगे-पाटील उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढील वर्षीपासुन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याची पुर्तता जलद गतीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण यांच्यामध्ये सामंजस्याने करार करण्याबाबतही सुचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

अधिष्टाता नियुक्ती, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचा सामंजस्य करार, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)या मुद्यांचा समावेश होता. आमदार कैलास घाडगे-पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  पीपीपीच्या मुद्याला विरोध दर्शविला. ग्रामीण भागामध्ये अशी गुंतवणुक करण्यासाठी कुणी तयार होणार नसल्याची अडचण उभयतांनी  बोलुन दाखविली. सिंधुदुर्गच्या धर्तीवर महाविद्यालयासह रुग्णालयदेखील शासनाच्या अधिपत्याखाली असावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री  ठाकरे यांनी ही मागणी मान्य करुन त्या पध्दतीने नियोजन करण्याच्या सुचना यावेळी दिल्या आहेत.

पुढच्याच वर्षी प्रवेश प्रक्रिया व्हावी यासाठी अधिष्टाता यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे, त्याची नियुक्ती करण्याचे आदेश यावेळी बैठकीत मुख्यमंत्री यांनी दिले. जेणेकरुन त्यांच्या माध्यमातुन पुढील प्रक्रियेचा सोपस्कार करणे शक्य होणार आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्यास त्याला अधिक गती मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने त्याचीही कार्यवाही करण्याचे आदेश  मुख्यमंत्री ठाकरे यांनी  दिले.


सदरील बैठकीस सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत, सार्वजनिक आरोग्य मंत्री .राजेश टोपे , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैय्या देशमुख , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री .शंकरराव गडाख-पाटील , मुख्य सचिव संजीवकुमार, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग) प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने, व्हिडीओ कॉन्फरन्स द्व्यारे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी  , जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.