सास्तूर अत्याचाराच्या निषेधार्थ लोहाऱ्यात भव्य मोर्चा

 


लोहारा  - लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पॉस्को  कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून पीडितेचे आर्थिक पुनर्वसन करावे, या मागणीसाठी विविध संघटनानी सोमवारी (ता.२६) तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. या मोर्चात सकल धनगर समाज, जिजाऊ ब्रिगेड, शाहू कामगार संघटना या संघटनांनी सहभाग घेतला.


लोहऱ्यातील शिवाजी चौकातून मोर्चाला सुरवात करण्यात आली. महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पीडितेला न्याय द्या, महिलांवरील अत्याचार थांबवा, आरोपींना कठोर शासन करा अशा आशयाचे फलक घेऊन मोठ्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने प्रभारी तहसीलदार रोहन काळे यांना निवेदन देण्यात आले.


समाजात आज बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण ज्या महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करतो व त्यांना डोक्यावर घेतो परंतु त्या महापुरुषांचे विचार आपण डोक्यात घेत नाही व त्यामुळेच समाजात विकृती वाढली आहे. परंतु यापुढे या विकृतांना योग्य धडा शिकवला जाईल व अशा बलात्कारी नराधमांच्या राई राईएवढ्या चिंधड्या उडविल्या जातील, असा यल्गार लोहारा येथील श्रीदुर्गा उमाकांत लांडगे या चिमुरडीने मोर्चाला संबोधित करताना केला आहे.


यावेळी बोलताना जय मल्हार सेनेचे पदाधिकारी उमाकांत लांडगे म्हणाले की, बलात्कारासारखी निंदनीय घटना समाजातील कोणत्याही मुलीवर अथवा महिलेवर होता कामा नये. घडलेली घटना सभ्य समाजाला काळिमा फासणारी असून अतिशय संतापजनक आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा, पीडित चिमुरडीचे आर्थिक पुनर्वसन करून तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, व लवकरात लवकर पीडित मुलीला न्याय द्यावा. अन्यथा थेट मंत्रालयावर धडक मारून सरकारला जागे करण्यात येईल, असा इशारा उमाकांत लांडगे यांनी यावेळी दिला.