वाणेवाडीच्या काका उंबरेची आश्रमशाळा अनधिकृत 

शाळेचा पत्ता नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधःकारमय 
 

धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथील श्री संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मीक संस्थेच्या आश्रमातील प्रेम लहु शिंदे या १४ वर्षीय  विद्यार्थ्यांने दि. ४ ते ५ ऑगस्टच्या दरम्यान काका महाराजाच्या सततच्या मारहाणीला कंटाळून  गळफास घेतला होता. मयत प्रेम शिंदे यांच्या शरीरावर  मारहाणीचे जवळपास ५० ते ६०  काळे - निळे वण  असल्यामुळे ही  हत्या की आत्महत्या हे पोलीस तपासानंतरच  निष्पन्न होणार आहे.

मयत प्रेम शिंदे याचे वडील लहू शिंदे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता . पैकी तीन जणांना अटक केली, पण मुख्य आरोपी असलेल्या काका उंबरे  आणि माऊली उंबरे  यांना  घटनेला १० दिवस उलटून गेले तरी अटक केली नव्हती. याप्रकरणी धाराशिव लाइव्हने बातम्या प्रकाशित करताच, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना  उशिरा जाग आली आणि हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. 

या प्रकरणात ढोकी पोलीस मालामाल झाल्याची चर्चा आहे. मुख्य आरोपी दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये आला असताना त्यास अटक न करणे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा दिवस झाले तरी अटक न करणे यातच ढोकी पोलिसांची नीतिमत्ता स्पष्ट होते. पोलिसांची  आरोपीबरोबर मिलीभगत असल्याने या प्रकरणांचा तपास देखील आजवर व्यवस्थित झाला नाही. दि. ४ ते ६ ऑगस्टचे सीसीटीव्ही तपासून ढोकी पोलिसांवर कडक कारवाई  करावी, अशी मागणी आहे. 

आश्रमशाळेला शासनाची मान्यता नाही 

वाणेवाडी येथील श्री संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मीक संस्थेच्या वतीने  चालवण्यात येणाऱ्या  आश्रमशाळेला शासनाची कसलीही मान्यता नाही. काका उंबरे  हा अनधिकृत आश्रमशाळा चालवतो, . या अनधिकृत आश्रमशाळेत  भरती करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थांकडून एका शैक्षणिक वर्षासाठी १५  हजार रुपये घेतले जातात , तसेच शाळेचा ड्रेस,कपडे, शालेय साहित्य देखील पालकांना सोबत द्यावे लागते तसेच भजन, कीर्तनासाठी लागणारे वाद्य पखवाज, ढोलक, तबला, पेटी हे देखील  पालकांनाच घेऊन द्यावे लागते. येथे शाळा नाही किंवा शाळेचे  वर्ग नाहीत, फक्त राहण्यासाठी व्यवस्था आहे.  वस्तीगृह म्हटले तरी वावगे होणार नाही. शाळेसाठी मुले २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोराळा  येथील संत गोरोबा काका विद्यालयात पाठवले जातात, पूर्वी धाराशिव येथील बँक कॉलनीतील शाळेत पाठवले जात होते. ज्या शाळेची पटसंख्या कमी आहे, तेथे विद्यार्थी पाठवले जातात. त्यामुळे येथे राहणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर होण्याऐवजी वारकरी होत होते. यानिमित्त अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हा काका महाराज अनेकवेळा मुलांना शाळेत देखील पाठवत नव्हता , त्याऐवजी शेतातील कामे करून घेत होता. तसेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील शेतात जुंपत  होता. अध्यात्माच्या नावावर विध्यार्थाचा छळ  सुरु होता. प्रेम शिंदे याने आपल्या वडिलांना त्याची सर्व कल्पना दिली होती. पण आपल्या मुलाला अध्यात्माचे शिक्षण मिळते म्हणून गप्प बसले आणि येथेच त्यांचा घात  झाला. 

काका उंबरे  हा अध्यात्माचे  शिक्षण देतो, खूप चांगली संस्था आहे , असा खोटा प्रचार  धाराशिवमधील काका उंबरेचा मावसभाऊ  कुकर्मी ( जो स्वतःला स्टार पत्रकार समजतो ) तो करत होता. पत्रकारितेच्या जोरावर या संस्थेला उद्योगपतींकडून देणग्या गोळा करीत  होता तसेच एखादी  बातमी दाबण्यासाठी देणगीच्या माध्यमातून लाच  गोळा करत होता. त्यामुळे काका महाराज आणि कुकर्मीच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. दोघेही आलिशान गाडीत फिरू लागले. ५० एकर शेती घेऊन आधुनिक शेती करू लागले. अध्यात्माच्या नावावर काका महाराज आणि कुकर्मीने गोरखधंदा सुरु केला आणि लातूर,  मुंबई येथे फ्लॅट, धाराशिवममध्ये एक कोटींचा बंगला बांधला. २० वर्षांपूर्वी धाराशिवच्या बस स्थानकावर एसटीडी सेंटरवर काम करणारा कुकर्मीने लाखो रुपयाची माया जमविली आहे. 

कडक कारवाई  करा 

वाणेवाडी येथे अध्यात्माच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून लोकांकडून देणग्या उकळणारा आणि गोरगरिब विद्यार्थाना शिक्षणाच्या नावाखाली शेतात सालगडी म्हणून राबवणारा तथाकथित महाराज काका उंबरे आणि कुकर्मीच्या संपत्तीची चौकशी करावी, प्रेम शिंदे मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे तसेच काका उंबरे  आणि कुकर्मी पत्रकाराच्या संपत्तीची इन्कम टॅक्स विभागाने चौकशी करावी, अशी मागणी आहे.