कोरोना : पुणे - मुंबईहून येणाऱ्या लोकांची माहिती ठेवण्याची भाजप नगरसेवकांची मागणी

 
उस्मानाबाद - कोरोना व्हायरसच्या धसक्याने उस्मानाबादकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे पुणे - मुंबईहून येणाऱ्या लोकांकडे लोक संशयाने पाहात आहेत. त्यात आता भाजप नगरसेवकांनी पुणे - मुंबईहुन येणाऱ्या लोकांची माहिती ठेवून त्यांच्या आरोग्याची चार दिवसाला तपासणी करण्याची मागणी केली आहे. यामुळे मूळ उस्मानाबादचे असणाऱ्या आणि सध्या  पुणे - मुंबईत राहणाऱ्या लोकांची मोठी कुचंबणा होत आहे.

 राज्यात फोफावत चाललेल्या “कोरोना” आजाराच्या पार्श्वभूमीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी नगरसेवकांची बैठक घेतली होती . त्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मागील दोन ते तीन दिवसातील घटनेचा आढावा घेऊन आज  उस्मानाबादच्या प्रतिष्ठान भवनात बैठक झाली.आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या या  बैठकिस भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, युवराज नळे, शिवाजी पंगुडवाले आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

            यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी “कोरोना” आजाराविषयी थोडक्यात माहिती सांगून अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता सर्वांनी आपली, आपल्या प्रभागातील सर्व जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी स्वच्छतेबाबत काळजी घेऊन योग्य ती उपाय योजना राबविण्यास संगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सर्वानुमते पुढील प्रमाणे महत्वाच्या बाबीं आवर्जून करण्याच्या ठरल्या, प्रत्येकाने आपआपल्या प्रभागतच राहून नागरीकांनी या आजारमुळे घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

बाहेर गावावरून खास करून पुणे व मुंबई येथून येणार्‍या नागरीकांच्या बाबत माहिती नोंदवून त्यांच्या आरोग्याविषयी दर ३-४ दिवसाला माहिती घेण्याची यंत्रणा नगर परिषद प्रशासनाने उभी करावी अशी मागणी करण्याचे ठरले.जेणेकरून त्यां व्यक्तींना संसर्ग झाला असल्यास इतरांना त्यांचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे शक्य होईल.

तसेच शहरातील फेरीवाले, पान टपरिवाले, असंघटित कामगार, छोटे व्यावसायीक, इत्यादी ज्यांचा उदरनिर्वाह हा दैनंदिन कामकाजावर चालतो अशा हातावर पोट असलेल्यांच्या उदरनिर्वाहाची सोय शासनाने करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्याचे ठरले.


हातावर पोट असलेल्या मजुरांना शासनाने मदत करावी.  - आ. राणाजगजितसिंह

           उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन एकीकडे विविध उपाययोजना राबवत आहे. कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे  रोजंदारीवर  काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांना शासनाने मदत करावी, अशी मागणी  भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.