जि. प. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी पदाची पदभरतीमध्ये महाघोटाळा 

एमपीडब्लू आणि स्टाफ नर्स च्या पदासाठी एक ते दोन लाख दर 
 
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य विभागात अनागोंदी 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य विभागात कंत्राटी पदाची पदभरतीमध्ये महाघोटाळा झाला आहे. एमपीडब्लू आणि स्टाफ नर्स च्या पदासाठी एक ते दोन लाख दर ठरला असून या भरतीमध्ये अनेकजण मालामाल झाले आहेत. 


उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंर्तगत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) मध्ये कंत्राटी पदाची पदभरती करण्यासाठी एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती करताना लेखी परीक्षा न घेता थेट तोंडी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. ही भरती करतांना एक ते दोन लाख असा दर ठरला असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 

 राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NRHM ) ला केंद्र सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात येत असून, कोरोना काळात या विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याच गैरव्यवहारातुन आलेल्या पैश्याच्या वाटणीवरून दोन कर्मचाऱ्यात काही दिवसापूर्वी  फ्री स्टाईल हाणामारी देखील झाली होती. 

आता याच विभागातील आणखी एक महाघोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) च्या वतीने काही दिवसापूर्वी कंत्राटी पदाची पदभरती करण्यासाठी  एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात  एमपीडब्लू ( पुरुष ) यांच्या १८ तर स्टाफ नर्स यांच्या १७ जागा निघाल्या आहेत. सदर भरती करताना लेखी परीक्षा न घेता थेट तोंडी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. 

सध्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.  एमपीडब्लू ( पुरुष ) जागेसाठी सॅनिटरी इन्फेक्टर कोर्सची आवश्यकता आहे.  ज्या उमेदवारांनी सॅनिटरी इन्फेक्टर  कोर्सची प्रमाणपत्रे  जोडली आहेत त्यातील अनेकांची  प्रमाणपत्रे बोगस आहेत. त्यांनाही पात्र ठरवण्यात आले आहे. या पदाकरिता एक ते दोन लाख असा दर ठरला असून, आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यात बडे आणि छोटे मिळून सात वाटेकरी ठरलेले आहेत. 

ही पदभरती पारदर्शक होण्यासाठी नव्याने अर्ज मागवण्यात यावेत तसेच लेखी परीक्षा घेण्यात  यावी, अशी मागणी होत आहे. ज्यांना पात्र ठरवण्यात आले, त्या सर्वांची कागदपत्रे / प्रमाणपत्रे वरिष्ठ पातळीवरून तपासण्यात यावीत अशी मागणी होत आहे. या गंभीर प्रकाराची आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  दाखल घ्यावी , अशी मागणी करण्यात आली आहे.