उमरग्यातील कोळीवाड्यात तरूणावर कत्तीने जीवघेणा हल्ला

हाणामारीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद 
 
तरुण गंभीर जखमी, उपचारासाठी लातूरला नेले

उमरगा -  मागील भांडणाचा राग मनात धरून शहरातील कोळी प्लॉट येथे गुरुवारी (ता. १७) सांयकाळी सहा तरूणांनी दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात कत्तीने मारहाण करून गंभीर जखमी केले. दरम्यान आपापसातील भांडणाचा रोष व्यक्त करण्यासाठी तरुण रस्त्यावर हत्यारे घेऊन येण्याचा प्रकार सुरू झाल्याने कोळीवाडा, काळे प्लॉटचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. कोळीवाड्यातील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 


उमरगा शहरातील काळे प्लॉटींगच्या दाट वस्तीत सर्व जाती, धर्माचे लोक रहातात. या भागातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह दररोजच्या मोलमजुरीवर अवलंबुन आहे. मात्र गेल्या दोन, तीन वर्षापासुन या भागात कांही तरुण दशहत माजवण्याचा प्रयत्न करताहेत. यापूर्वी या भागातील कांही संशयित तरूणांनी तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा खुन केल्याचे गुन्हे दाखल आहेत, याशिवाय मुलींना लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेणे आणि रस्त्यावर किरकोळ भांडणावरून दशहत निर्माण करण्याचा प्रकार वारंवार घडतो आहे. 

मध्यंतरी कांही महिने शांत असलेल्या या भागात पुन्हा तरुणांच्या दोन वेगवेगळ्या गटात अंतर्गत धुसपुस सुरु झालेली दिसते आहे. गुरुवारी सांयकाळी कोळीवाडा येथे सहा तरुणांनी दोन मोटार सायकल वरून येत  अभिषेक बनसोडे वय अंदाजे  २० वर्ष याच्यावर कत्तीने हल्ला केला. डोक्यात गंभीर जखमी असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर लातूरच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.